सीमा हैदरकडून मोबाईल, पासपोर्ट ताब्यात | पुढारी

सीमा हैदरकडून मोबाईल, पासपोर्ट ताब्यात

लखनौ, वृत्तसंस्था : पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरकडून पोलिसांनी चार मोबाईल, पाच पासपोर्ट आणि दोन व्हिडीओ कॅसेटस् ताब्यात घेतले आहेत.

सीमा व तिचा पती सचिन याची दहशतवादीविरोधी पथकाकडून (एटीएस) गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. सचिनवरील प्रेमापोटी चार मुलांसह सीमा भारतात आली आहे. तिने सचिनसोबत लग्न केले आहे. सीमाला मायदेशी पाठवून देण्यासाठी पाकमधील कट्टरपंथीयांकडून हिंदू मंदिर आणि अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केले जात आहे.

सोशल साईटस्वरून भारतीय तरुणांना हनीट्रॅपद्वारे जाळ्यात ओढण्यात येत असल्याच्या घटना अलीकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे हेरगिरीच्या संशयावरून सीमाची चौकशी करण्यात येत आहे. तिच्याकडून पासपोर्ट, मोबाईल आणि ध्वनिफीती ताब्यात घेतल्या आहे. तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला जात असून, काही प्रश्नांना तिने उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचेही चौकशीतून पुढे आले आहे. त्यामुळे सीमा आणि सचिन लव्हस्टोरीबाबत गूढ वाढण्याची शक्यता आहे.

प्रश्न : नेपाळमार्गे भारतात येताना तू बसचालकाच्या मोबाईलद्वारे सचिनशी संपर्क साधलास. मग तू चार मोबाईल फोन सोबत कशासाठी ठेवलेस?

उत्तर : पाकिस्तानी लोक ट्रेस करतील म्हणून मोबाईलमध्ये सीमकार्ड घातले नव्हते. सचिनला भेटल्यावर नवीन सीमकार्ड मोबाईलमध्ये घातले.

प्रश्न : तुझेे दोन पासपोर्ट आहेत. यातील खरा कोणता?

उत्तर : सीमा नावाचा आणि सीमा हैदर नावाचे दोन्ही पासपोर्ट माझेच आहेत.

प्रश्न : तुझे काका आणि भाऊ आर्मीत आहे. त्यांनी तुला भारतात पाठविले आहे का?

उत्तर : माझ्या त्यांच्याशी अनेक वर्षे संपर्क आलेला नाही. काही चॅनेल्सवर मी आयएसआय एजंट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतात आल्यावरच मला आयएसआयविषयी माहिती मिळाली.

प्रश्न : तुझेे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. मग अस्खलित इंग्रजी कसे बोलता?

उत्तर : 2019 नंतर पब्जी खेळताना अनेक मुले इंग्रजीत संभाषण करीत होती. त्यांच्या संभाषणातून माझे इंग्रजी चांगले झाले.

प्रश्न : उर्दू, अरबी, सिंधीशिवाय तुला हिंदीतही चांगले बोलता येते. कुणी प्रशिक्षण दिले का?

उत्तर : सचिनवरील प्रेमापोटी मी भारतात आले आहे. मला कुणी प्रशिक्षण दिलेले नाही.

प्रश्न : आम्ही तुला पाकला पाठवत नाही, किंवा तुरुंगातही टाकणार नाही. एवढ्या पैशाची तरतूद कशी केली?

उत्तर : पहिला पती गुलामला दुबईत पाठविण्यासाठी मी दागिने विकले होते. सचिनसाठी मी माझ्या नावावर असणारे घर विकून 7 लाखांची व्यवस्था केली.

Back to top button