पाळीव कुत्रा हरवला, पोलीस कर्मचार्‍यांच्‍या निलंबनाची न्‍यायाधीशांची मागणी | पुढारी

पाळीव कुत्रा हरवला, पोलीस कर्मचार्‍यांच्‍या निलंबनाची न्‍यायाधीशांची मागणी

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : कोलकाता उच्‍च न्‍यायालयात नुकतीच बदली झालेले न्‍यायमूर्ती गौरांग कांत यांचा पाळीव कुत्रा ( Pet Dog ) हरवला आहे. या प्रकरणी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्‍यात यावे, असे मागणी असणारे पत्र त्‍यांनी दिल्ली पोलिसांचे सह पोलिस आयुक्त (सुरक्षा) यांना पाठवले आहे.

न्यायमूर्ती कांत यांनी पत्रात आरोप केला आहे की, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तैनात असलेले पोलीस कर्मचारी सूचना देऊनही दार बंद ठेवले नाही, त्‍यामुळे त्‍यांचा पाळीव कुत्रा हरवला( Pet Dog ). कुत्रा ट्रॅफिकमध्ये हरवला की वाहनाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालेले नाही, असेही त्‍यांनी पत्रात नमूद केले आहे.

अशा निष्काळजीपणा माझ्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो

दरवाजा बंद ठेवण्यासाठी वारंवार विनंती करूनही माझ्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझ्या सूचनांचे पालन केले नाही. कर्तव्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमता याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे कारण यामुळे माझ्या जीवनाला आणि स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असेही त्‍यांनी पत्रात म्‍हटले आहे. तसेच माझ्या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवला आहे. संबंधितानंा तात्काळ निलंबित करून वरील प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी विनंतीही त्‍यांनी या पत्राच्‍या माध्‍यमातून केली आहे. आपण केलेल्‍या कारवाईबाबत तीन दिवसांमध्‍ये कळवावे, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

पदाचा गैरवापर न करण्याचा सरन्यायाधीशांनी दिला होता इशारा

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे पत्र समोर येण्याच्‍या काही दिवसांपूर्वी, सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या सर्व मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून त्यांच्या पदाचा गैरवापर करू नये, असा इशारा दिला होता. सरन्‍यायाधीश म्‍हणाले होते की, न्यायाधीशांना उपलब्ध असलेल्या प्रोटोकॉल सुविधांचा वापर इतरांना गैरसोय होईल किंवा न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टीका होईल, अशी कार्यपद्धती असू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले होते.

हेही वाचा :

 

 

Back to top button