Tomatoes Robbery : अपघाताचा बहाणा करून टोमॅटो वाहतूक करणार्‍या ‘पिकअप’वर मारला डल्ला, दाम्पत्याला अटक

Tomatoes Robbery : अपघाताचा बहाणा करून टोमॅटो वाहतूक करणार्‍या ‘पिकअप’वर मारला डल्ला, दाम्पत्याला अटक

पुढारी ऑलनाईन डेस्क : टोमॅटोचे भाव इतके वाढले आहेत की आता ते चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. कर्नाटकातील बेंगळूर येथेही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. टोमॅटोने भरलेल्या बोलेरो पिकअपवरच चोरट्यांनी डल्ला मारला. विशेष म्‍हणजे अपघाताचा बहाणा करत चाेरट्यांनी टाेमॅटाे चाेरीचा कट रचला. या प्रकरणी पाेलिसांनी  एका दाम्पत्याला तामिळनाडूतून अटक केली आहे. भास्कर आणि त्याची पत्नी सिंधुजा अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

ही घटना बेंगळूरच्या एपीएमसी यार्ड परिसरातील आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथील शेतकरी शनिवारी मध्यरात्री बोलेरो पिकअप मधून लाखो रुपये किमतीचे टोमॅटो कोलार बाजारपेठेत घेऊन जात होते. बाजारात जात असताना पिकअपची एका कारला धडक बसली. या धडकेत कारच्या विंडशील्डचा चक्काचूर झाला. त्यावरून कारमधील लोक आणि बोलेरोचा चालकामध्‍ये यांच्यात हाणामारी झाली. या नुकसानीच्या बदल्यात कारचालकाने शेतकरी व बोलेरो चालकाकडून २० हजार रुपयांची मागणी केली.  कारचालकाने शेतकरी व बोलेरो चालकाला बळजबरीने वाहनातून बाहेर काढले आणि टोमॅटोने भरलेली पिकअप घेऊन पोबारा केला. यानंतर संबंधीत शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली. गाडीमध्ये टोमॅटोचे २१० कैरेट भरले होते. त्याची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

तामिळनाडूतील दाम्पत्याला अटक

टोमॅटो चोरी प्रकरणी पोलिसांनी तामिळनाडू राज्यातील एका जोडप्याला अटक केली आहे. वेल्लोर येथे राहणारे हे जोडपे महामार्गावर दरोडे घालणाऱ्या टोळीतील आहेत. टोमॅटो चोरीच्या वेळीही या दाम्पत्याने प्लॅन करून प्रथम त्यांची कार शेतकऱ्याच्या गाडीवर घातली आणि नंतर नुकसानीच्या पैशाची मागणी करत भांडण केले. यादरम्यान ते टोमॅटोने भरलेली गाडी घेऊन पळून गेले. भास्कर आणि त्याची पत्नी सिंधुजा अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news