Manipur Violence : मणिपूर हिंसाचारादरम्यान ‘पुरुषाच्या शिरच्छेदाचा’ आणखी एक व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारादरम्यान 'पुरुषाच्या शिरच्छेदाचा' आणखी एक व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Violence : मणिपूर हिसांचारादरम्यान महिलांच्या नग्न परेडचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. त्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर मणिपूर हिंसाचरादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला आहे. यामध्ये एका पुरुषाचे धडावेगळे केलेल्या डोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे तेथील संघर्षाच्या रानटीपणाची पातळी पुन्हा एकदा समोर आली आहे. दोन्ही व्हायरल व्हिडिओ कुकी समुदायातील आहेत. या व्हायरल व्हिडिओतील घटना दोन जुलै रोजी झाल्याचे मानले जात आहे.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओवर मणिपूर पोलिसांनी अद्याप भाष्य केलेले नाही. तसेच महत्वाचे म्हणजे या घटनेत देखील मणिपूर पोलिस स्वतः सहभागी होते, असा आरोप करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये तशी नोंद असल्याचे हिंदुस्थान टाइम्सने म्हटले आहे.

Manipur Violence : व्हिडिओतील डोके कोणाचे; आदिवासी समुदायांनी ओळख पटवली

व्हायरल व्हिडिओत ज्या पुरुषाचे डोके आहे त्याच्या आदिवासी समुदायातील लोकांनी त्याची ओळख पटवली आहे. शिरच्छेदासारख्या निर्घृण खुनाच्या घटनेत जो मयत झाला त्याचे नाव डेव्हिड थेक असल्याचे तेथील आदिवासी समुदायातील लोकांनी म्हटले आहे. तो चुराचंदपूर येथील लामझा गावचा रहिवासी आहे.

मयत थेकच्या कुटुंबियांशी समन्वय साधत असलेल्या ITLF (Indigenous Tribal Leaders Forum) च्या सदस्य मेरीने सांगितले की, पीडितेला नोकरीसाठी मुंबईला जायचे होते परंतु मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर ती अडकली होती.

मयत थेक हा कुटुंबातील एकमेव कमावणारा होता. कोविड महामारीपूर्वीपर्यंत तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. कोरोना महामारीमुळे तो 2020 मध्ये मणिपूरला त्याच्या गावी परतला. त्याची नोकरी गेली होती का नव्हती याची स्पष्ट माहिती नाही. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला मुंबईला परत जायचे होते. मात्र, तो हिंसाचारात अडकला. तो लहान असतानाच त्याची आई वारली. त्याच्या वडिलांना शारीरिक व्यंग आहे. कुटुंबातील गरीब परिस्थितीमुळे त्याला आणि त्याच्या धाकट्या भावाला शाळा सोडावी लागली, असे मेरीने सांगितले.

Manipur Violence : घटना कशी घडत गेली

मेरीने पुढे म्हटले की त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत झालेल्या संवादातून असे समजत आहे की, थेकला प्रथम गोळी मारण्यात आली, नंतर त्याचे शीर धडावेगळे करण्यात आले. तसेच त्याचा एक डोळा देखील बाहेर पडला. शिरच्छेदानंतर त्याचे डोके बांबूच्या कुंपणावर ठेवले होते.

तर गावकऱ्यांच्या माहितीनुसार, जेव्हा पहिल्यांदा हल्ला झाला तेव्हा थेकने एक महिला आणि तिच्या दोन मुलांची सुटका केली आणि गावाबाहेर सुरक्षित ठिकाणी पाठवले. त्यानंतर थेक त्याच्या मित्राची वाट पाहत होता जो स्कूटर घेण्यासाठी बाहेर गेला होता. दोघांना गावातून स्कूटरवरून पळून जायचे होते पण जमावाने पकडले.

इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) च्या सदस्यांनी सांगितले की, “लांगझा आणि चिंगलांगमेई या आदिवासी गावांवर क्रूर हल्ला करण्यात आला. ज्या दरम्यान थेकचा शिरच्छेद करण्यात आला. थेकसह त्यांनी गावातील सर्व घरेही जाळली.

Manipur Violence : शिरच्छेदासाठी एका आमदाराच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांवर आरोप

याबाबत आयटीएलएफ सदस्यांनी एका आमदाराच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांवर थेकचा शिरच्छेद केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपाची स्वतंत्रपणे पडताळणी करता आलेली नाही, असे हिंदुस्थान टाइम्सने म्हटले आहे.

Manipur Violence : थेकच्या काकांकडून तक्रार दाखल; FIR मध्ये पोलिसांवरही आरोप

या घटनेची तक्रार थेकचे काका बुओनखावलेन यांनी दिली. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुओनखावलेन यांनी माहिती देताना म्हटले आहे की त्यांना पोलिसांकडून अद्याप पुढील काही माहिती मिळालेली नाही. ते म्हणाले थेकच्या शरीराचे तुकडे करून जाळण्यात आले. तसेच त्यांनी पोलिसांच्या काही कमांडोंवरही आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेत मणिपूर पोलिसांचे काही कमांडोही सामील होते. पोलिसांनी मला एफआयआरची प्रत दिली आहे. मात्र, कोणताही तपशील मला मिळालेला नाही. याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच हिंदुस्थान टाइम्सच्या माहितीनुसार एफआयआरमध्ये मणिपूर पोलिस कमांडोंचे या प्रकरणात आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.

मणिपूर हिंसाचार : महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक

मणिपूर लष्कराकडे सोपवा काँग्रेसची मागणी; महिला आमदार आक्रमक

Manipur Women Assaulted : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर ४० जणांकडून लैंगिक अत्याचार; महिला आयोगाकडील अन्य ३ तक्रारीतील माहिती उघड

Back to top button