मणिपूरमधील 'ताे' व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्याचे केंद्राचे निर्देश | पुढारी

मणिपूरमधील 'ताे' व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्याचे केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमध्‍ये दोन महिलांना निर्वस्त्र करुन फिरविल्याच्या घटनेचा व्हिडिओ आपापल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावा, असे निर्देश केंद्र सरकारने टि्टरसहित इतर सोशल मीडीया माध्यमांना दिला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एन. वीरेन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ( Manipur video )

मणिपूरमध्‍ये व्‍हायरल होत असलेल्‍या व्हिडिओमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची सि्थती बिघडू शकते, त्यामुळे सर्व सोशल मीडीया माध्यमातून हा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ नुसार कोणताही कंटेट सोशल मीडीयावरुन काढून टाकण्यासाठी आदेश देण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. आता त्‍याचा व्हिडिओ व्हायरल झाल्‍याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Manipur video : मणिपूरमध्ये तणाव

या प्रकरणातील दोषींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात मैतेई आणि नागा-कुकी समुदायामध्ये मागील दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. मैतेई समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्यास नागा-कुकींना विरोध चालविलेला आहे.

Back to top button