Delhi Flood News | दिल्लीत यमुना नदीच्या पुराचे रौद्र रूप! लष्कराची मदत मागितली, राजघाटसह आयटीओवर पुराचे पाणी | पुढारी

Delhi Flood News | दिल्लीत यमुना नदीच्या पुराचे रौद्र रूप! लष्कराची मदत मागितली, राजघाटसह आयटीओवर पुराचे पाणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीत यमुना नदीच्या पुराचे पाणी महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाट, सर्वोच्च न्यायालयाचे प्रवेशद्वार तसेच दिल्ली पोलिसांचे मुख्यालय असलेल्या आयटीओपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कर तसेच एनडीआरएफची मदत केंद्राकडे मागितली आहे. (Delhi Flood News)

पुराचे पाणी हळूहळू ओसरत असले तरी अनेक भागात साचलेली पाण्याची डबकी जशीच्या तशी आहेत. दिल्ली जलसंधारण आणि पूर व्यवस्थापन खात्याच्या रेग्युलेटरमध्ये पाणी शिरल्याने हा रेग्युलेटर खराब झाला आहे, त्यामुळे राजघाट आणि आयटीओ परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी युध्दपातळीवर रेग्युलेटर दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. केजरीवाल यांनी घटनास्थळावर जाऊन रेग्युलेटरची पाहणीही केली.

यमुना नदीतील पुराची पातळी शुक्रवारी (दि.१४) रोजी सकाळी आठ वाजता २०८.४८ मिलिमीटरवर पोहोचली होती, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाकडून देण्यात आली. पुरामुळे प्रभावग्रस्त भागातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडत असल्याने हे पाणी यमुना नदीत येत आहे. हथिनी कुंडातून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने आयपी एक्सटेन्शन भागातील दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दिल्ली विमानतळापासून जवळ असलेल्या धौलाकुंवा, यमुना बाजार या ठिकाणी पाणी साचले आहे. तर विजेचे खांब पाण्यात गेल्याने आयटीओ भागात काही लोकांना शॉक बसला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४ पासून जवळ असलेल्या सराय कालेखां येथे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. अशीच स्थिती आयटीओ आणि विकास मार्गावर भागात होती. काश्मिरी गेट आंतरराज्य बस टर्मिनलमध्ये पाणी शिरल्याने हे टर्मिनल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या बसेस सिंघू सीमेवर थांबविल्या जात आहेत. पुराचा धोका लक्षात घेऊन गुरुवारी सुमारे चार हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली होती.

हेही वाचा : 

Back to top button