नाशिक : पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात आढळला अतिदुर्मीळ ‘पोवळा’ साप | पुढारी

नाशिक : पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात आढळला अतिदुर्मीळ 'पोवळा' साप

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील टोलनाका परिसरातील सूरज कुयटे यांच्या हाॅटेलजवळ अत्यंत दुर्मीळ जातीचा पोवळा साप सापडला. पावसाळ्यात बिळामध्ये पाणी गेल्यावर साप बाहेर पडून लोकवस्तीकडे येतात. त्यात दुर्मीळ सापही दिसू लागले आहेत.

नामशेष होत चाललेले अनेक दुर्मीळ वन्यजीव या परिसरात सापडत आहेत. अनोळखी साप आढळल्याने कुयटे यांनी तत्काळ वन्यजीवरक्षक पिंटू पवार, स्वप्निल देवरे यांच्याशी संपर्क साधला. सर्पतज्ज्ञ सुशांत रणशूर यांनी पोवळा साप असल्याची खात्री केली. अत्यंत दुर्मीळ असलेला हा साप पकडला असून, वनविभागाचे नाना चौधरी, विजय टेकनार यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आले.

कसा असतो पोवळा साप…

या सापाला हिंदीत कालाधारी मूंगा म्हणतात. इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक आहे, तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलिओफिस मेलानुरुस (Calliophis melanurus Snake) म्हटले जाते. अतिशय दुर्मीळ जातीचा असलेला हा साप जाडीने कमी असतो. तसेच त्याचा रंग फिकट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा, तर शेपटीवर दोन काळ्या कडी असतात. जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यास असतो. हा साप अतिशय विषारी असून, तो मानवी वस्तीत आढळत नाही. तो दुर्मीळ असल्यामुळे त्याने दंश केल्याच्या घटना अभावानेच आढळतात. या सापाचे विष निरोटॉक्सिक असल्यामुळे तो चावल्यास सूज येणे, चावलेल्या भागात यातना होणे. 20 ते 30 मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येऊन मृत्यू होणे, असे प्रकार घडतात. वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत वन्य जिवांच्या वर्गवारीत शेड्युल (२) मध्ये समाविष्ट आहे.

हेही वाचा : 

Back to top button