मुंबई, पुढारी वृत्तसेवा : खातेवाटपाआधी मंत्रिमंडळ विस्तार करा, या मागणीवर शिंदे गट अडून बसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतरच खातेवाटप होणार आहे. याच आठवड्यात शुक्रवारी किंवा शनिवारी एकदाचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत महायुतीत एकमत झाले आहे. या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी चार ते पाच आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. (Cabinet Expansion)
शिवसेनेचे विधानसभा प्रतोद भरत गोगावले, संजय रायमूलकर, बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे; तर भाजपकडून संजय कुटे, माधुरी मिसाळ किंवा देवयानी फरांदे, रणधीर सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या कोणाचा समावेश होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा शपथविधी येत्या चार दिवसांत केव्हाही होऊ शकतो. शुक्रवार किंवा शनिवारचा मुहूर्त मिळू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी होऊन आता दहा दिवस झाले, तरी खातेवाटप होऊ शकलेले नाही. खातेवाटप करण्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करा, असा शिंदे गटातील आमदारांचा आग्रह असून, त्यांनी विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढविला होता. त्याचा परिणाम म्हणून खातेवाटप रखडले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री बिनखात्याचे म्हणूनच वावरत आहेत; पण आता विस्तार करण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. विस्तारानंतरच खातेवाटप जाहीर केले जाणार आहे.
2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी अचानकपणे करण्यात आला. त्यावेळी शपथविधीची तयारी राजभवनाच्या अधिकार्यांना काही तासांत करावी लागली होती. त्यामुळे साधेपणाने हा शपथविधी पार पडला. मात्र, मंत्रिमंडळाचा होणारा हा तिसरा विस्तार आहे. यामध्ये नऊ ते दहा मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे. शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आता काही तासांवर आल्याचे सांगितले.
राजभवनातही शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. मंगळवारी अधिकार्यांनी दरबार हॉलची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, भरत गोगावले यांनी आपला मंत्री म्हणून समावेश निश्चित झाला असून, आम्हाला कधीही बोलावणे येईल, असे सांगितले. ते नातेवाईकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपच्या गोटातून बुधवारी संध्याकाळी किंवा शुक्रवारी हा शपथविधी होऊ शकतो, असे सांगण्यात आले. गुरुवारी भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित केले आहे. शिबिराला राज्यातील सर्व आमदार, मंत्री तसेच राज्यातील केंद्रात असलेले मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारी शपथविधी होणार नाही. झाला तर तो गुरुवारच्या आधी किंवा नंतरच होईल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेला (शिंदे) सात मंत्रिपदे मिळतील. आमचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे. आम्हाला मंत्रिमंडळातील निम्मी पदे द्यायचे ठरले आहे. त्या पद्धतीने हा विस्तार होईल, असे भरत गोगावले यांनी सांगितले. ते म्हणाले, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आपणच होणार आहे. पालकमंत्री झाल्याशिवाय रायगडचा विकास होणार नाही. आमचे तेथे पाच आमदार आहेत, असा पुनरुच्चारही गोगावले यांनी केला.
शिंदे गटाचा सात मंत्रिपदांवर दावा मंत्रिमंडळातील 39 जागा भरल्या असून, अजून 14 जागा रिक्त आहेत. त्यापैकी सात मंत्रिपदांवर शिंदे गटाने दावा केला आहे. एक ते दोन दिवसांमध्ये हा विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्हाला तयारीत राहायला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही तयारीत बसलो आहोत. कधीही कॉल येईल, तसे आम्ही निघू, असे भरत गोगावले यांनी सांगितले. (Cabinet Expansion)
खातेवाटपापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार हवा; शिंदे गटातील आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव
* शिंदे गटाच्या दबावामुळे खातेवाटप रखडले
* आता विस्तारानंतरच खातेवाटप
* मंत्रिमंडळातील 39 जागा
* भरल्या; 14 जागा रिक्त
* फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरल्याचा शिंदे गटाचा दावा
* राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी