राजस्‍थान पुन्‍हा जिंकण्‍यासाठी पायलट यांचा काँग्रेसला सल्‍ला, “पक्षाने समजून घ्‍यावे…” | पुढारी

राजस्‍थान पुन्‍हा जिंकण्‍यासाठी पायलट यांचा काँग्रेसला सल्‍ला, "पक्षाने समजून घ्‍यावे..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमध्‍ये मुख्‍यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट ( Sachin Pilot )  यांच्‍यातील मतभेद हा मागील चार वर्ष चर्चेचा विषय ठरला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्‍लक असताना या संघर्षावर पडदा पडला आहे. दोन्‍ही नेत्‍यांमधील मतभेद दूर करण्‍यात पक्षश्रेष्‍ठींना यश आले आहे. त्‍यामुळे काँग्रेस नव्‍या दमाने डिसेंबरमध्‍ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्‍यान, सचिन पायलट यांनी राज्‍यात काँग्रेसला पुन्‍हा यश मिळवून देण्‍यासाठी पक्षश्रेष्‍ठींना सल्‍ला दिला आहे.

… तर काँग्रेस २५ वर्षांचा ट्रेंड मोडून काढेल

सचिन पायलट यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती कशी असावी, यावर भाष्‍य केले. ते म्‍हणाले, पक्षाने समजून घेणे गरजेचे आहे की, विधानसभा निवडणुकीच्‍या पूर्वी चार ते पाच महिने पक्षाने आपली रणनीती आखावी. यामुळे मागील २५ वर्ष सूरु असलेला एकदा भाजप तर एकदा काँग्रेस निवडून येण्‍याचा ट्रेंड मोडून काढता येईल. यामुळे राजस्‍थानमधील सत्ता सलग दुसर्‍यांदा मिळवण्‍यात पक्षाला यश येईल.

काँग्रेसला अनेक राज्‍यांमध्‍ये यश मिळवायचे आहे : Sachin Pilot

यावर्षी अनेक राज्‍यांमध्‍ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसला अनेक राज्‍यांमध्‍ये यश मिळवायचे आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशासित राज्‍यांचे व्‍यासपीठ असेल तर याचा नक्‍कीच पक्षाला मोठा फायदा होणार आहे, असा विश्‍वासही पायलट यांनी यावेळी केला.

मूलभूत प्रश्‍नांवरील लक्ष हटविण्‍यासाठीच ‘समान नागरी’ची गुगली

केंद्र सरकारने समान नागरी कायदावर केवळ चर्चा सुरु केले आहे. कारण याबाबत कोणताही ठोस प्रस्‍ताव नाही. भाजप सरकारने केवळ गुगली टाकली आहे. सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या मूलभूत समस्‍यांपासून लक्ष विचलित करण्‍याचा हा डाव आहे. समान नागरी कायद्याबाबत कोणताही ठोस प्रस्ताव नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्राकडून त्याचा वापर फक्त ‘राजकीय साधन’ म्हणून केला जात आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

हेही वाचा :

 

 

Back to top button