Rain in North India: उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ ; दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू | पुढारी

Rain in North India: उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ ; दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात पावसाचा कहर सुरू आहे. रविवारी (दि.९ जून) देखील झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला (Rain in North India) आहे, असे वृत्त ‘टाईम्‍स ऑफ इंडियाने’ने दिले आहे.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) या राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील नद्या इशारा पातळीच्या वरुन वाहत आहेत. यामुळे हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात भूस्खलन देखील होत आहे.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंडीमध्ये बियास नदी दुथडी भरून वाहत आहे. कुल्लू येथे बियास नदीच्या प्रवाहात राष्ट्रीय महामार्ग 3 चा काही भागही वाहून गेला आहे त्यामुळे अटल बोगदा आणि रोहतांगकडे जाणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळत (Rain in North India) आहेत.

उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ: अपडेट्स

  • हिमाचल प्रदेशातील खराब हवामानामुळे शिमला-कालका मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • कुल्लूच्या कासोल परिसरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अनेक गाड्या वाहून गेल्या.
  • बियास नदीची पाणी पातळी वाढल्याने मंडीतील पंचवक्त्र मंदिर पाण्यात बुडाले आहे.
  • हिमाचल प्रदेशातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था 10 आणि 11 जुलै रोजी बंद राहतील.

  • येत्या २४ तासात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने, सावधगिरी बाळगली पाहिजे.आम्ही प्रशासनाला सर्व खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली आहे.
  • मुसळधार पावसामुळे शिमल्यातील चाबा पॉवर हाऊसला पूराचा दणका बसला आहे.
  • मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग शनिमंदिर औटजवळील डोंगरावरून दरड कोसळल्याने आणि खडक कोसळल्याने बंद झाला आहे. कटौल मार्गे मंडी-कुल्लू रस्ता भूस्खलनामुळे बंद झाला आहे. पांडोह-गोहर-चालचौक-बग्गी-सुंदरनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे, परंतु अवजड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध आहेत, अशी माहिती मंडी पोलिसांनी दिली आहे.
  • सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने चाबा पूल वाहून गेला आहे

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एका कनिष्ठ आयुक्त अधिकार्‍यांसह (जेसीओ) दोन जवान वाहून गेले. लष्कराचे जवान सुरनकोट भागातील डोगरा नाला ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. यामधील दोन जवानांचे मृतदेह सापडल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हिमाचल प्रदेशातील श्रीखंड महादेव यात्रेदरम्यान पार्वतीबागजवळील टेकडीवरून पडून एका यात्रेकरूचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे हिमाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान 9 आणि 10 जुलैसाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तसेच शिमला जिल्ह्यातील कुमारसैन भागातील माधोली गावात भूस्खलनाची घटना घडली ज्यामध्ये घर कोसळून 3 जणांचा (आई आणि दोन मुले) मृत्यू झाला.

जम्मू-कश्मीरमध्‍ये भूस्खलनामुळे बसला अपघात

जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भूस्खलनामुळे बस कोसळली. यामध्ये दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर तीन अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत, गंडोह रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये रविवारी (दि.९ जून) मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळल्याने एक महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. नियाझुरा (उत्तर प्रदेश) गावात आज पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली.

Rainfall in NW & Delhi : उत्तर- पश्चिम भारतात ‘का’ पडतोय पाऊस?

उत्तर भारतात वारंवार वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती निर्माण होत असते. हे एक पश्चिमी वाऱ्यांमुळे निर्माण होणारे एकप्रकारचे वादळ असून, यामुळे मोठ्या प्रमाणात हवामान बदल होतात. हे वारे हिमालयाकडून आडवले जातात आणि यामुळे उत्तरेकडील या भागात पाऊस पडतो किंवा बर्फवृष्टी होते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी चक्रवात निर्माण झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. याचा प्रभाव असतानाच शनिवार (दि. ८ जून) आणि रविवारी ( दि. ९ जून) रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. पश्चिम चक्रावात आणि नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर पश्चिम भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. तसेच दिल्लीमध्ये देखील मुसळधार पावसाने ४० वर्षाचा पावसाचा रेकॉर्ड तोडला आहे.

हेही वाचा:

Back to top button