Sugarcane FRP: सांगलीमध्ये ‘स्वाभिमानी’ने कृष्णा कारखान्याकडे निघालेली वाहने रोखली | पुढारी

Sugarcane FRP: सांगलीमध्ये ‘स्वाभिमानी’ने कृष्णा कारखान्याकडे निघालेली वाहने रोखली

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : Sugarcane FRP : वाळवा तालुक्यात ऊसदर आंदोलन पेटले आहे. बुधवारी सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बहे पुलावर कृष्णा कारखान्याकडे निघालेल्या तीन ट्रॅक्टरची हवा सोडून, तोडफोड केली. सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तालुक्यात ऊस तोडी गतीने सुरू झाल्या आहेत. कोणत्याही कारखान्याने अद्याप एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही.

बुधवारी सायंकाळी बहे पुलावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा कारखान्याकडे निघालेले ट्रॅक्टर रोखून धरले. चाकातील हवा सोडून, वाहनांची तोडफोड करण्यात आली. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर करावी अन्यथा कारखान्याकडे ऊसाचे एकही कांडे जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी संघटनेने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यानी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याने एफआरपीसाठी टाळटाळ करीत आहेत. जो पर्यंत तोडगा निघत तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोड घेऊ नये, वाहनांची मोडतोड टाळण्यासाठी ऊस वाहतूक बंद करावी.

भागवत जाधव (जिल्हाउपाध्यक्ष, युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना)

Back to top button