Sharad Pawar | शरद पवार यांचा दौरा अखेर ठरला! ‘इथे’ फोडणार पहिला नारळ | पुढारी

Sharad Pawar | शरद पवार यांचा दौरा अखेर ठरला! 'इथे' फोडणार पहिला नारळ

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार पुन्हा एखाद्या पक्ष बांधणीसाठी ताज्या दमाच्या युवकासारखे मैदानात उतरणार आहेत. शरद पवार हे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात ही नाशिकमधील येवला येथून होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, ८३ वर्षाचा योद्धा पुन्हा मैदानात उतरून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडणार आहे. शरद पवार यांच्या दौऱ्याची सुरूवात ही उद्या शनिवारी (दि. ८ जुलै) सायंकाळी ४ वाजता नाशिकमधील येवला येथून ऐतिहासिक सभेने होणार आहे. धुळे आणि जळगाव दौरा (Sharad Pawar)  पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘या वादळाला कोण थांबवणार?’ म्हणत रोहित पवारांनी दिला दौऱ्याला दुजोरा

सध्या महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. परंतु शरद पवार या झंजावाती वादळाचा अंदाज अजून अनेकांना नाहीय! त्यामुळे या वादळाला आता कोण थांबवणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शरद पवार यांचा नाशिक दौरा होणारच! असा ठाम विश्वास देखील रोहित यांनी व्यक्त केला आहे. हे ‘वादळ’ मुंबई, नाशिक मार्गे उद्या येवल्यात दाखल होईल! त्यामुळे तयारीत रहा असे आवाहन रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना (Sharad Pawar) केले आहे.

हेही वाचा:

Back to top button