Tomato prices | टोमॅटोची लाली वाढली, दर १५० रुपये पार, इतका महाग का झाला? | पुढारी

Tomato prices | टोमॅटोची लाली वाढली, दर १५० रुपये पार, इतका महाग का झाला?

पुढारी ऑनलाईन : देशातील बहुतांश भागात टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपये पार झाला आहे. देशातील अनेक भागांत हीच स्थिती आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपयांवर गेला आहे. टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने हस्तक्षेप करून भाज्यांचे दर नियंत्रणात ठेवावेत, असा सूर ग्राहक व्यक्त करत आहेत. (Tomato prices)

अधिकृत आकडेवारीनुसार, मंगळवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचा किरकोळ भाव प्रति किलो १५५ रुपयांवर होता. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोलकाता येथे टोमॅटोचा उच्चांकी दर नोंदवला गेला. पश्चिम बंगालमधील पुरुलिया भागात टोमॅटो १५५ रुपये किलोने विकला जात होता.

उष्मा आणि मान्सूनचे उशिराने आगमन यामुळे उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात टोमॅटोचा तुडवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. कोलकात्यात टोमॅटोचा दर प्रति किलो १४८ रुपये, मुंबईत सर्वात कमी ५८ रुपये आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये टोमॅटोचा दर अनुक्रमे ११० रुपये किलो आणि ११७ रुपये आहे. (Price of tomatoes)

दिल्लीत स्थानिक विक्रेते टोमॅटो १२०-१४० रुपये दराने विकत आहेत. टोमॅटो उत्पादक राज्यांमधून गेल्या दोन आठवड्यांपासून पुरवठा विस्कळीत झाला असून पीक काढणी आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने दरवर त्याचा परिणाम झाला आहे.

टोमॅटोच्या किमतीतील सध्याची वाढ ही एक हंगामी स्वरुपाची आहे आणि येत्या १५ दिवसांत दर कमी होऊन परिस्थिती महिनाभरात सामान्य होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

टोमॅटो इतका महाग का झाला?

एका अहवालांनुसार, मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक वाढ झाली. यामुळे पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला तसेच पिकाचे उष्म्यामुळे नुकसान झाले. परिणामी उत्पादनात घट झाली.

हे ही वाचा :

Back to top button