इंधन दरवाढ पुन्हा सुरू; मुंबईत पेट्रोल ११४ रुपयांच्या समीप - पुढारी

इंधन दरवाढ पुन्हा सुरू; मुंबईत पेट्रोल ११४ रुपयांच्या समीप

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : इंधन दरवाढ : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इंधनाचे दर दोन दिवस स्थिर ठेवल्यानंतर दरवाढीला पुन्हा सुरुवात केली आहे. तेल कंपन्यांकडून बुधवारी पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 107.94 रुपयांवर तर डिझेलचे दर 96.67 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे मुंबईत पेट्रोल 113.80 तर डिझेल 104.75 रुपयांवर पोहोचले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ सुरु आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वधारलेले दर तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे इंधन दरात वाढ केली जात असल्याचे कारण तेल कंपन्यांकडून दिले जात आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे प्रति बॅरलचे दर 85 डॉलर्सच्या वर गेलेले आहेत. विशेष म्हणजे विमानाच्या इंधन दराच्या (एटीएफ) तुलनेत पेट्रोल आता 36.63 टक्के महाग झाले आहे. देशातील अन्य महानगरांचा विचार केला तर तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 104.83 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 100.92 रुपयांवर गेले आहेत. प. बंगालमधील कोलकाता येथे हेच दर क्रमशः 108.46 आणि 99.78 रुपयांवर गेले आहेत.

Back to top button