पुढारी ऑनलाईन : शेअर बाजाराची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी कायम आहे. आज मंगळवारी (दि.४) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ३०० हून अधिक अंकांनी वाढून ६५,५०० चा टप्पा पार केला. तर निफ्टी १९,४०० वर व्यवहार करत आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ६५,५०० चा आकडा पार केला. काल सोमवारी सेन्सेक्स ६५,२०५ वर बंद झाला होता. आज मंगळवारी तो ६५,५०३ वर खुला झाला. तर सुरुवातीच्या व्यवहारात त्याने ६५,५८६ अंकांपर्यंत झेप घेतली. (Stock Market Opening) बाजारातील तेजीत बॅँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर आहेत. बाजारात चौफेर खरेदी दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचा शेअर ७ टक्क्यांनी वाढून ७,८६७ रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर सेन्सेक्सवर टॉप गेनर आहे. बजाज फिनसर्व्ह, टायटन, टीसीएस, एलटी, विप्रो, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया हे शेअर्सही वाढले आहेत. तर भारती एअरटेल, रिलायन्स, एनटीपीसी, टाटा स्टील, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Opening)
मंगळवारी बहुतांश आशियाई बाजारात घसरण दिसून आली. दरम्यान, गुंतवणूकदारांचे मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर वाढीच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका डॉलर आणि कच्च्या तेलाचे दर स्थिर पातळीवर आहेत.
MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक मंगळवारी सकाळी ०.१ टक्के खाली होता. ऑस्ट्रेलियन शेअर्स बहुतेक सपाट झाले आहेत. जपानचा निक्केई निर्देशांक सरासरी १.१ टक्क्यांनी घसरला.
हे ही वाचा :