शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी | पुढारी

शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी

मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी लावलेला खरेदीचा सपाटा, देशाच्या परकीय चलनसाठ्यात झालेली वाढ आणि घटत चाललेली महागाई, या प्रमुख कारणांमुळे सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी (सोमवारी) शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. हा सार्वकालिक उच्चांक ठरला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

सेन्सेक्स 486 अंकांच्या तेजीसह 65,205 अंकांवर स्थिरावला. या निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (निफ्टी) निर्देशांक 134 अंकांच्या तेजीसह 19,322 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 24 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. एवढेच नव्हे, तर बँक निफ्टी निर्देशांकानेदेखील 45 हजार अंकांचा टप्पा गाठला. बँक निफ्टी 45,158 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल 298.21 लाख कोटी रुपयांवर गेले.

बाजार भांडवलात मोठी वाढ

शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असणार्‍या कंपन्यांच्या बाजार भांडवलात (मार्केट कॅप) मोठी वाढ झाली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.76 लाख कोटींची उसळी दिसून आली. म्हणजेच या घडामोडींमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसत असून, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानेही बाजाराला भक्कम आधार मिळाला आहे.

30 जून रोजी झाला होता विक्रम

याआधी शुक्रवारी (30 जून) शेअर बाजाराने सार्वकालिक उच्चांक गाठला. सेन्सेक्स 803 अंकांच्या वाढीसह 64,718 च्या पातळीवर बंद झाला होता.

Back to top button