पुढारी विशेष : हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्रात 32 वाणांवर संशोधन; केरळ, मेघालयाच्या बेण्याची प्रायोगिक तत्‍वावर लागवड | पुढारी

पुढारी विशेष : हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्रात 32 वाणांवर संशोधन; केरळ, मेघालयाच्या बेण्याची प्रायोगिक तत्‍वावर लागवड

हिंगोली, गजानन लोंढे : जिल्ह्यातील वसमत येथे सुरू झालेल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्रात पहिल्याच वर्षी 25 एकर क्षेत्रावर हळदीच्या तब्बल 32 प्रजातींच्या हळदीचे बेणे उपलब्ध करण्यात आले असून, या बेण्याची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली जाणार आहे. त्यातील कुरकुमिन घटक ज्या वाणात अधिक प्रमाणात आढळून येईल, त्या वाणाची पुढील काळात शिफारस केली जाणार आहे. विशेष म्हणजे, येथील संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर मेघालय, केरळ येथील वाणांचीही लागवड केली जाणार आहे.

खासदार हेमंत पाटील यांच्या विशेष पुढाकारातून मंजूर झालेल्या हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राला पहिल्या टप्प्यात दहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून वीजपुरवठ्यासाठी 200 के.व्ही. क्षमतेचे रोहित्र उभारण्यात येत आहे. तसेच दीड कोटी रुपये खर्च करून शेततळेही पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी विविध 32 प्रकारच्या वाणांची लागवड केली जाणार आहे. मेघालयातील लॅकाडोंग तसेच केरळमधील 11 प्रकारचे बेणे उपलब्ध करण्यात आले आहे. या बेण्यांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड झाल्यानंतर वाणांसाठी महाराष्ट्रातील वातावरण कसे राहील, कोणत्या वाणांमध्ये कुरकुमिन घटक अधिक मिळेल याची हळदीच्या काढणीनंतर चाचणी घेतली जाणार आहे. एकरी उत्पादनाचा अंदाज घेऊनच त्या वाणाच्या लागवडीबाबत शेतकर्‍यांना शिफारस केली जाणार आहे.

या वाणांचा असेल समावेश…

हळद संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर लॅकाडोंग, काळी हळद, फुले स्वरूपा, राजेंद्र सोनिया, रोमा, सुरोमा, राजापुरी, सेलम, कडप्पा, आंबेहळद, दारूहळद आदी वाणांची लागवड केली जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेले बेणेसुद्धा संशोधन केंद्रावर उपलब्ध झाले आहे. सध्या लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. हळदीचे शास्त्रीय नाव कुरकुमा लोंगा असून ती झिंझी बरेशी कुळातील आहे. महाराष्ट्रात घेण्यात येणार्‍या हळदीमध्ये कुरकुमिनचे प्रमाण 4 टक्क्यांच्या आसपास आहे. दर्जेदार हळदीच्या वाणात हे प्रमाण सात ते साडेसात टक्के असते. विशेष म्हणजे राजेंद्र सोनिया या वाणात 8.4 टक्के, रोमा व सुरोमा या वाणात 9 टक्क्यांपेक्षा जास्त कुरकुमिनचे प्रमाण आहे. आंबेहळद औषधीसाठी वापरली जाते. तिचा उपयोग रक्त शुद्धीकरण व सूज हारक औषधी म्हणून केला जातो. दारूहळद किंवा काळी हळद या प्रजातीत बर्बेरिनचे प्रमाण जास्त असते. तिचा आयुर्वेदातही उल्लेख आहे. या हळदीचा उपयोग आव व अतिसारावरील औषधीमध्ये करण्यात येतो.

राज्यातील हळद उत्पादनास प्रोत्साहन

हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जास्त उत्पन्न देणार्‍या प्रजाती, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, स्थानिक व जागतिक बाजारपेठेतील उपलब्धता, उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, कुरकुमिनचे प्रमाण आदींबाबत संशोधन केले जाणार आहे. त्यानंतर शेतकर्‍यांना त्याचा फायदा होऊन हिंगोलीसह राज्यातील शेतकर्‍यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

Back to top button