Himachal Pradesh Flood & Landslide : हिमाचलमध्ये पावसाने हाहाकार; 9 जणांचा बळी; 104 कोटींचे नुकसान..300 हून अधिक मार्ग बंद; हजारो पर्यटक अडकले… | पुढारी

Himachal Pradesh Flood & Landslide : हिमाचलमध्ये पावसाने हाहाकार; 9 जणांचा बळी; 104 कोटींचे नुकसान..300 हून अधिक मार्ग बंद; हजारो पर्यटक अडकले...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Himachal Flood & Landslide : भारतात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. हिमालच प्रदेशमध्ये 24 जून रोजी मान्सून सक्रिय झाला. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सोमवारी प्रचंड मुसळधार पावसाने अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे चंदीगढ-मनाली हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. यामुळे शेकडो यात्रेकरू मंडी येथे अडकले आहेत. हिमाचल-उत्तराखंडमध्ये मिळून 300 हून अधिक मार्ग रविवारपासून बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प असून हजारो पर्यटक अडकले आहेत.

Himachal Pradesh Flood & Landslide : 9 जणांचा मृत्यू तर 14 जखमी

पाऊस आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहे. 4 घर पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले आहेत. तर 28 घरांना काही प्रमाणात नुकसान पोहोचले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत जवळपास 104 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती हिमाचलचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव ओंकारचंद शर्मा यांनी दिली आहे.

वाहतुकीसाठी मंडी-पंडोह मार्ग एका बाजूने उघडला

प्रंचड पाऊस आणि भूस्खलनामुळे सोमवारी 6 मैलांपर्यंत बंद केलेला मंडी-पंडोह खंड मार्ग एकतर्फी वाहतुकीसाठी उघडण्यात आला आहे. मात्र, वाहनांची गती रोडावली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्गावर पडलेले मोठे दगड हटविण्यासाठी विस्फोटकांचा वापर करण्यात आला.

Himachal Pradesh Flood & Landslide : 20 तासानंतर मार्ग खुला

हिमाचलमध्ये 140 वीज ट्रान्सफॉर्मर खंडित झाले. मुसळधार पावसामुळे मंडी शहरापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या पंडोह-कुल्लू मार्गावर खोटीनाल्ला येथे अचानक पूर आला आणि रविवारी संध्याकाळपासून प्रवासी तेथे अडकून पडले. मंडी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूस्खलनामुळे बंद झालेला मंडी-कुल्लू मार्गे कटोला रस्ता सुमारे 20 तासांनंतर खुला करण्यात आला असून, आता यातून छोटी वाहने पाठवली जात आहेत.

हिमाचल उत्तराखंडमध्ये 300 हून अधिक मार्ग बंद हजारो पर्यटक अडकले

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जवळपास 301 रस्ते बंद झाले आहेत तर उत्तराखंडमध्ये सुमारे 43 रस्ते बंद आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे 301 रस्ते बंद झाले आहेत. त्यापैकी 180 रस्ते सोमवारी सायंकाळपर्यंत खुले करण्यात येणार होते. त्याचबरोबर 15 रस्ते आज (मंगळवारी) तर उर्वरित रस्ते 30 जूनपर्यंत खुले करण्यात येणार आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी 390 जेसीबी, डोझर आणि टिप्पर तैनात करण्यात आले आहेत. तसेच, विभाग आज एक क्रमांक जारी करेल ज्यावर लोक रस्त्याशी संबंधित समस्या सांगू शकतील.

Himachal Pradesh Flood & Landslide : हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने आज हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, 28 आणि 29 जूनला हवामान खात्याने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा पिवळा अलर्ट जारी केला आहे. रविवारी, ढगफुटीमुळे सोलन आणि हमीरपूर जिल्ह्यात अचानक पूर आला आणि मुसळधार पावसामुळे शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. तसेच पिकांचे, घरांचे व वाहनांचे नुकसान झाले. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, हमीरपूर आणि शिमला जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्ती पुराच्या पाण्यात बुडाली. यासह 11 घरे आणि अनेक वाहने तसेच चार गोशाळांचेही पावसामुळे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा :

Snowfall in Himachal Prades : हिमाचल प्रदेश, मनालीत बर्फवृष्टी; देवभूमीत पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

हिमाचल प्रदेशमध्‍ये पावसाचा कहर, मंडी जिल्‍ह्यात माेठे नुकसान

Back to top button