Pm Narendra Modi: कार्यकर्ता ही भाजपची सर्वात मोठी ताकद- पंतप्रधान मोदी | पुढारी

Pm Narendra Modi: कार्यकर्ता ही भाजपची सर्वात मोठी ताकद- पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन: भाजपच्या कार्यकर्त्याला पक्षापेक्षाही देश मोठा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यासाठी देशाचे हित सर्वोपरि आहे. त्यामुळे जिथे देश मोठा असतो तिथे कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो.  ‘कार्यकर्ता’ ही भाजपची सर्वात मोठी ताकद आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि.२७) व्यक्त केले. भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या अभियानाच्या माध्यमातून  देशभरातील  भाजप बुथ कार्यकर्त्यांशी (Pm Narendra Modi) संवाद साधला.

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्ही (कार्यकर्ते) केवळ भाजपचेच नाही तर देशाच्या संकल्पपूर्तीचे खंबीर सैनिक आहात. त्यामुळे मी या कार्यक्रमाची संकल्पना मांडल्याबद्दल भाजपचे अध्‍यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपशासित राज्यांतील नेत्यांचे अभिनंदन करतो.  कदाचित कोणत्याही राजकीय पक्षाच्या इतिहासात तळागाळात एवढा मोठा कार्यक्रम संघटित पद्धतीने कधीच झाला नसेल, जितका मोठा आज इथे होत आहे’, असेही पीएम मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

‘वंदे भारत ट्रेन’ राज्यातील कनेक्टिव्हिटीला चालना देईल : पंतप्रधान

मध्य प्रदेशला आज (दि.२७) दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मिळाल्याबद्दल मी मध्य प्रदेशातील जनतेचे अभिनंदन करतो. भोपाळ ते इंदौर आणि भोपाळ ते जबलपूर हा प्रवास आता वेगवान आणि आरामदायी होणार आहे. वंदे भारत ट्रेन राज्यातील कनेक्टिव्हिटीला चालना देईल, असे मत भोपाळमध्ये भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी व्यक्त केले आहे.

‘सेवा’ हेच एकमेव ध्येय

बूथच्या अंतर्गत संघर्षाची आवश्यकता नाही तर सेवा हेच एकमेव ध्येय आणि माध्यम असले पाहिजे. भाजपच्या बूथ कमेटीची ओळख ही सेवेच्या माध्यमातून झाली पाहिजे, असेही मत पीएम मोदी यांनी व्यक्त केले आहे.

जेव्हा गावाचा विकास होईल तेव्हाच देश विकसित होईल

आम्हाला २०४७  पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचे आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल. आपला देश तेव्हाच विकसित देश होईल जेव्हा आमची गावे विकसित होतील. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक बूथ कार्यकर्त्याने, त्यांचे बूथ मजबूत आणि विकसित करण्यासाठी काम केले पाहिजे,असेही पीएम मोदी म्हणाले. आमचे ध्येय केवळ एका लाभार्थ्याला योजनेचा लाभ देणे नाही, तर संपूर्णपणे १०० टक्के लोकांना योजनांचा लाभ देणे आहे. ज्या सुविधेवर व्यक्तीचा हक्क आहे त्याला त्याचा १०० टक्के लाभ मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान काही लोक फक्त पक्षासाठी जगतात. त्यांना त्यांच्या पक्षाचाच फायदा करायचा आहे. भ्रष्टाचार, कमिशन आणि कपात केलेल्या पैशातून त्यांना वाटा मिळतो म्हणून ते असे करतात. त्यांनी हा मार्ग निवडला आहे कारण त्यांना कष्ट करावे लागत नाहीत, अशी टीका देखील पीएम मोदी यांनी विरोधकांना उद्देशून केली.

हेही वाचा:

Back to top button