रत्नागिरी, सिंधुदुर्गात मान्सूनधारा; पुढील २ दिवस यलो अलर्ट | पुढारी

रत्नागिरी, सिंधुदुर्गात मान्सूनधारा; पुढील २ दिवस यलो अलर्ट

कणकवली, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्गात यावर्षी मृग नक्षत्र प्रथमच कोरडे गेले. गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गवासीयांना पावसाची प्रतीक्षा होती. शुक्रवारपासून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला आणि दुपारपासून पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात हजेरी लावली. उष्म्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना आणि काही प्रमाणात भात पेरणी केलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्गात मान्सूनधारा बरसल्या. मात्र, पावसाला म्हणावा तसा जोर नसल्याने अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे.

पाऊस नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. अनेक वाड्यांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता जोरधार पावसाकडे डोळे लागून राहिले आहेत.

यावर्षी मान्सून पूर्व पाऊस दमदारपणे बरसला नाहीच आणि जो मान्सून दाखल झाला तोही केवळ हजेरी लावून गायब झाला. त्यामुळे जूनचा पाऊन महिना कोरडाच गेला. उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन आणि घामाच्या धारा बरसत होत्या. मात्र, पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.

सिंधुदुर्गात आतापर्यंत 30 ते 40 टक्केच पेरणीची कामे झाली आहेत. अद्यापही पेरणीची कामे बाकी आहेत. पाऊस नसल्याने नदी, नाले आणि विहिरी कोरड्या ठणठणीतच आहेत. मृग नक्षत्रात दरवर्षी जोरदार पाऊस होतो. मात्र, यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेले. शुक्रवारपासून आर्द्रा नक्षत्र सुरू झाले आणि पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांपासून पाऊस जोर धरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार पावसाने संकेत देत बरसण्यास सुरुवात केली आहे. जो तरवा रुजून आला आहे त्याला पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी सकाळपासून दिवसभरात पावसाच्या सरी बरसल्या. मात्र, याहून अधिक दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.

पुढील दोन दिवस जोरदार; रत्नागिरी, सिंधुदुर्गात ‘यलो अलर्ट

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : मोसमी पावसाने पाठ फिरविल्याने उर्वरित महाराष्ट्रात पुन्हा तापमान चढ राहू लागले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत असताना कोकण किनारपट्टी भगात मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात काही भगात हलक्या सरी झाल्यांतर शुक्रवारीही पावसाने हलकी ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली.

ही पोषकता आगामी दोन दिवस कायम राहणार असून रत्नागिरी आणि सिंधुदर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुले पुढील दोन दिवसासाठी या दोन्ही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टी लगत या कालावधीत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

संगमेश्वरात दमदार

साडवली, पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून पावसाने दमदार आगमन करत जोरदार हजेरी लावली. अचानक बरसलेल्या पावसामुळे वाहनचालक, व्यापारी व नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

गेले काही दिवस तालुक्यातील वातावरण ढगाळ होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. गरमीने नागरिक हैराण झाले होते. तर पेरणीची कामे झाल्यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून पावसाने बरसायला सुरूवात केली. बराचवेळ पाऊस बरसत होता. पावसाच्या आगमनाने मात्र बळीराजा सुखावला आहे. शेतीची कामे करण्यास शेतकरी मोकळा झाला आहे. दुसरीकडे पाऊस बरसल्याने हवेत गारवा आला असून गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील देवरूखसह साखरपा, संगमेश्वर, आरवली, तुरळ, डिंगणी, आंगवली, दाभोळे परिसरासह तालुक्यात पावसाने जोरदार आगमन केले. तालुक्यात बर्‍याच ठिकाणी सध्यस्थितीला नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काळेकुट्ट ढग दाटून आले होते.

Back to top button