Assam Flood : आसामच्या नलबारी जिल्ह्यात पुरामुळे हाहाकार; १०८ गावे पाण्याखाली; ४५,००० लोक बाधित | पुढारी

Assam Flood : आसामच्या नलबारी जिल्ह्यात पुरामुळे हाहाकार; १०८ गावे पाण्याखाली; ४५,००० लोक बाधित

पुढारी ऑनलाइन डेस्क : Assam Flood : आसामच्या नलबारी जिल्ह्यात पुरामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे. नलबारीसोबतच आसामच्या खालच्या भागाच्या जिल्ह्यातील ६ महसूल मंडळांर्गत सुमारे १०८ गावे सध्या पाण्याखाली गेली आहेत. तर ४५००० लोक बाधित झाले आहेत. गेल्या काही दिवसात आसाम आणि शेजारील देश भूतानमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पगलाडिया नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या संपूर्ण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मोईरंगा, बटाहघिला गावातील सुमारे २०० कुटुंबे या महापुरामुळे बाधित झाली असून बहुतांश कुटुंबे आता तात्पुरते तंबू बनवून रस्त्यांवर आणि बंधाऱ्यांवर आसरा घेत आहेत. पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील घोगरापार, तिहू, बारभाग आणि धमधामा भागातील जवळपास ९० गावे बुडाली असून पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेक गावकऱ्यांना घरे सोडून रस्त्यावर, उंच जमिनीवर आश्रय घ्यावा लागला आहे.

Assam Flood : पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान

पुराचे पाणी सर्वत्र घुसले असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३१० हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. गेल्या 24 तासांत पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील दोन बंधारे, १५ रस्ते, दोन पूल, कल्व्हर्ट आणि कृषी बंधा-यांचे नुकसान झाले आहे.
पूरग्रस्त जिल्ह्यात १.०७ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि कुक्कुटपालन आहेत. त्यांनाही पुराचा फटका बसला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अहवालानुसार, मुसळधार पावसाने अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नवनवीन भाग पाण्याखाली जात आहेत. एकट्या नलबारी जिल्ह्यात ४४७०७ लोक बाधित झाले आहेत, त्यानंतर बक्सामध्ये २६५७१ लोक, लखीमपूरमध्ये २५०९६ लोक, तामुलपूरमध्ये १५६१० लोक, बारपेटा जिल्ह्यात ३८४० लोक प्रभावित झाले आहेत.”

Assam Flood : बचाव कार्य सुरू

दरम्यान, NDRF, SDRF आणि अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे. बुधवार पर्यंत १२८० लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

Assam Flood : पूरग्रस्त – कोणाच्या मालमत्तेचे नुकसान तर कोणी सर्वस्व गमावले

मोईरंगा गावातील पुरग्रस्त व्यक्ती मनोज राजबोंगशी एएनआयशी बोलताना म्हणाले, पुराचे पाणी त्यांच्या घरात घुसले. त्यामुळे त्यांचे कुटुंब आता तटबंदीमध्ये राहत आहे. “माझ्या घरात पुराचे पाणी शिरल्यानंतर माझे कुटुंब आता बंधाऱ्यात राहत आहे. पुराचे पाणी आमच्या घरात शिरल्यानंतर आमच्या घराच्या अनेक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. माझ्या घरात आता गुडघाभर पाणी आहे. पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. आता आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे,”, असे मनोज राजबोंगशी म्हणाले.

मोईरंगा गावातील ज्योतिष राजबोंगशी या आणखी एका ग्रामस्थांनी सांगितले की, पुरामुळे त्यांचे सर्वस्व गमावले आहे, त्यांच्या घरातील सर्व वस्तूंचे नुकसान झाले आहे.

या पुरामुळे माझे सर्वस्व गमावले आहे. आमच्या घरातील प्रत्येक वस्तूचे नुकसान झाले आहे. मी माझ्या पत्नीसह आता या तटबंधाऱ्यात राहत आहे. आम्हाला घरातून कोणतेही सामान बाहेर काढता आले नाही,” ज्योतिष राजबोंगशी म्हणाले.

हे ही वाचा :

Assam Flood : आसामधील पूरस्थिती गंभीर; नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

Earthquake : आसाममधील तेजपूरला भूकंपाचा धक्का; कोणतीही जीवितहानी नाही

Back to top button