समाजाने नैतिकदृष्ट्या ‘वाईट’ ठरवलेली आई मुलांच्‍या कल्‍याणासाठी चांगली असू शकते : केरळ उच्‍च न्‍यायालय | पुढारी

समाजाने नैतिकदृष्ट्या 'वाईट' ठरवलेली आई मुलांच्‍या कल्‍याणासाठी चांगली असू शकते : केरळ उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : समाजासाठी किंवा नातेसंबंधातील व्यक्तींसाठी एखादी स्त्री नैतिकदृष्ट्या वाईट असू शकते; परंतु संबंधित आई  मुलाच्या कल्याणासाठी चांगली असू शकते, असे निरीक्षण नुकतेच केरळ उच्च न्यायालयाने ( Kerala High Court ) नोंदवले. तसेच या प्रकरणी कौटुंबिक न्‍यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत मुलाचा ताबा महिन्‍यातील काही दिवस आईकडेही दिला जावा, असा आदेश न्‍यायालयाने दिला. (Parent-child relationships)

कौटुंबिक न्‍यायालयाने दिला होतो वडिलांकडे मुलाचा ताबा

पत्‍नी दुसर्‍या पुरुषासोबत पळून गेली आहे. त्‍यामुळे मुलाचा ताबा मिळावा, अशी मागणी पतीने अलाप्पुझा कौटुंबिक
न्‍यायालयात केली होती. संबंधित महिला आपल्‍या आनंदासाठी दुसर्‍या पुरुषाबरोबर पळून गेली आहे. तिने निवडलेला मार्ग हा मुलाच्‍या कल्‍याणासाठी बाधा आणू शकतो, असे सांगत कौटुंबिक न्‍यायालयाने संबंधित मुलाचा ताबा वडिलांकडे देण्‍याचा निर्णय दिला होता.

Parent-child relationships : मुलाच्‍या ताब्‍यासाठी आईची उच्‍च न्‍यायालयात धाव

मुलाचा ताबा मिळावा, अशी मागणी करत संबंधित पत्‍नीने अलाप्पुझा कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या आदेशाला केरळ उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले. तिने दाखल केलेल्‍या याचिकेत म्‍हटलं होते की, पतीने कौटुंबिक न्‍यायालयात चुकीची माहिती दिली आहे. पतीसोबत असणारे मतभेद वाढले होते. त्‍यामुळे मला मला पतीचे घर सोडावे लागले. लग्‍नापसून मुक्‍त होण्‍याचा निर्णय घेत भावाच्‍या मित्रासोबत राहण्‍याचा निर्णय घेतला, असेही पत्‍नीने दाखल केलेल्‍या याचिकेत नमूद केले होते. संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती ए मुहम्मद मुस्ताक आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Parent-child relationships : केवळ मुलाच्‍या कल्‍याणाचा विचार होणे आवश्‍यक

केरळ उच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, “समाजाने निर्माण केलेली तथाकथित नैतिकता त्यांच्या स्वत:च्या नैतिकतेवर आणि नियमांवर आधारित असते. पालक आणि मूल यांच्यातील नातेसंबंधात ही तथाकथित नैतिकता प्रतिबिंबित होण्‍याची गरज नाही. अशा प्रकरणांमध्‍ये सर्वप्रथम मुलाच्‍या कल्‍याणचा विचार केला पाहिजे.”

समाजाने वाईट ठरवलेली आई मुलाच्‍या कल्‍याणासाठी चांगली असू शकते

नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीसाठी पुरुष किंवा स्त्री वाईट असू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती त्याच्या/तिच्या मुलासाठी वाईट आहे. एक आई समाजाने नैतिकदृष्ट्या वाईट ठरवली असली तरी ती मुलाच्या कल्याणासाठी चांगली असू शकते,” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. तसेच आम्ही असे मानतो की, पालकांनी मुलाचा चक्रीय ताबा घेणे दोघांच्याही हिताचे असेल. मुलाचा ताबा वडिलांबरोबर महिन्‍यातील काही दिवसांसाठी आईकडेही दिला जावा, याची तत्‍काळ अंमलबजावणी करावी, असा आदेश खंडपीठाने दिला.

कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या निकालावर उच्‍च न्‍यायालयाचे ताशेरे

संबंधित महिला दुसर्‍या पुरुषासोबत पळून गेली आहे. तिने तिच्‍या आनंदासाठी हा मार्ग निवडला आहे. तिचा हा निर्णय
मुलाच्‍या कल्‍याणसाठी बाधा निर्माण करणारा आहे, असे निरीक्षण नोंदवत कौटुंबिक न्‍यायालयाने मुलाचा ताबा संबंधित वडिलांकडे सोपवला होता. अनेकदा परिस्थिती अशी असते की, एखाद्याला वैवाहिक घर सोडावे लागते. जर एखादी स्त्री दुसर्‍या व्यक्तीबरोबर आढळली तर ती आनंदासाठी गेली, असे गृहित धरू शकत नाही. कौटुंबिक न्‍यायालयाने निकाल देताना वापरलेला भाषा निषेधार्ह आहे, अशा शब्‍दांमध्‍ये उच्‍च न्‍यायालयाने कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या निकालावर ताशेरे ओढले.

हेही वाचा :

 

 

Back to top button