Balasore Train Accident Updates: सीबीआयकडून सिग्नल जेई आमिर खानचे घर सील | पुढारी

Balasore Train Accident Updates: सीबीआयकडून सिग्नल जेई आमिर खानचे घर सील

पुढारी ऑनलाईन डेस्क: ओडिशातील बालासोर रेल्वे अपघाताची (Balasore Train Accident Updates) चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. दरम्यान, सीबीआयने मोठी कारवाई करत सोरो सेक्शन सिग्नलचे ज्युनियर इंजीनियर आमिर खान यांचे घर सील केले आहे. अपघाताचा तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. मात्र, या चौकशीनंतर आमिर खान कुटुंबासह घर सोडून बेपत्ता झाला होता. सीबीआयचे पथक आज (दि.२०) पुन्हा चौकशी करण्यासाठी आमिर भाड्याने राहत असलेल्या घरात दाखल झाले. पण दरवाजाला कुलूप लावल्याचे आढळून आले. याबाबत शेजाऱ्यांकडूनही काही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी घर सील केले.

२ जून रोजी बालासोरच्या बहनगा रेल्वे स्थानकाजवळ (Balasore Train Accident Updates) एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. या दुर्घटनेत २९२ जणांचा मृत्यू झाला होता. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेमागे रेल्वेच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिममध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

सीबीआयने ६ जूनपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी सिग्नल जेई आमिर खानसह अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांची अज्ञातस्थळी चौकशी केली. या सर्वांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, सीबीआयचे पथक सोमवारी पुन्हा आमिर खानच्या घरात त्याची चौकशी करण्यासाठी पोहोचले. परंतु, ते कुलूपबंद आढळले. गेल्या अनेक दिवसांपासून तो कुटुंबासह बेपत्ता असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

Balasore Train Accident Updates : ५ रेल्वे कर्मचारी सीबीआयच्या रडारवर

बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी ५ रेल्वे अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये बहनगा बाजार रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरसह ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे चार रेल्वे कर्मचारी ट्रेनला सिग्नल आणि पास देण्याच्या कामात गुंतले होते. हे पाच रेल्वे कर्मचारी अद्याप ड्युटीवर आहेत. त्यांना सीबीआयकडून वेळोवेळी चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंटरलॉकिंग सिस्टम पॅनेल सील केले आहे

सीबीआय अधिकाऱ्यांनी तपास सुरू करताच त्यांनी प्रथम बहनगा रेल्वे स्थानकाचे लॉगबुक, तांत्रिक उपकरणे आणि रिले पॅनल जप्त केले. यासोबतच बहनगा रेल्वे स्थानक आणि त्यात बसवण्यात आलेले इंटरलॉकिंग सिस्टीम पॅनलही सील करण्यात आले आहे. जेणेकरून कोणीही सिग्नल यंत्रणेत प्रवेश करू नये. यासोबतच बहनगा स्थानकावर गाड्या थांबवण्यासही पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत सीबीआयने जेईचे घर सील केल्याने इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button