ओडिशा : रेल्वे अपघात झालेले बहानगा बाजार स्थानक सीबीआयकडून सील | पुढारी

ओडिशा : रेल्वे अपघात झालेले बहानगा बाजार स्थानक सीबीआयकडून सील

बालासोर; वृत्तसंस्था : गेल्या आठवड्यात ज्या बहानगा बाजार स्थानकावर भीषण रेल्वे अपघात झाला होता, ते स्थानकच सीबीआयने सील केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत या स्थानकावर एकही रेल्वेगाडी थांबणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, बहानगा बाजार येथील रेल्वे मार्ग दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक सुरू झाली आहे. या स्थानकावर सात रेल्वेगाड्यांचा थांबा आहे. मात्र सीबीआयने तपासासाठी हे स्थानकच सील केले आहे. तसेच त्यांनी येथील लॉगबुक, रिले पॅनेल ताब्यात घेतले आहे. सिग्नलिंगला आवश्यक असलेली यंत्रणाही सील करण्यात आली असल्याने येथे तपास पूर्ण होईपर्यंत या स्थानकावर एकही रेल्वे अथवा मालगाडी थांबणार नाही.

चौधरी म्हणाले की, या स्थानकावरून रोज 170 रेल्वे गाड्यांची ये-जा होत असते; पण येथे फक्त सात पॅसेंजर गाड्यांनाच थांबा आहे. आसपासच्या 25 हून अधिक खेड्यांतील मजुरांना बालासोरला जाण्यासाठी हे स्थानक सोयीचे आहे.

Back to top button