Foxconn ची इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राला पसंती?, पण… | पुढारी

Foxconn ची इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राला पसंती?, पण...

पुढारी ऑनलाईन : टेस्ला नंतर आता आयफोन मेकर फॉक्सकॉन (Foxconn) भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरु करण्याच्या तयारीत आहे. एलन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) देशातील प्रवेशाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी भारताला नुकतीच भेट दिली होती. आता सुमारे एक महिन्यानंतर भारतातील EV क्षेत्राला आणखी एक मोठी चालना मिळेल असे दिसते.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, iPhones ची कंत्राटी उत्पादक म्हणून ओळखली जाणारी Foxconn कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहने (EVs) बनवण्याचा विचार करत आहे आणि ही कंपनी त्याबाबत अनेक राज्य सरकारांशी थेट चर्चा करत आहे. एक भारतीय शिष्टमंडळ लवकरच तैवानला भेट देणार आहे आणि कंपनीच्या ईव्ही योजनांबाबत चर्चा करण्यासाठी फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

ही कंपनी महाराष्ट्रात आपला प्लांट उभारण्यास इच्छुक आहे, पण काही आव्हानांमुळे ते तामिळनाडूत ऑटो मॅन्युफॅक्चरिंग सुरु करु शकते. फॉक्सकॉन चेन्नईमध्ये आयफोनची निर्मिती करत आहे. तसेच या कंपनीला तेलंगणा हे आउटरीच आणि प्रोत्साहनाच्या बाबतीत सर्वात सक्रिय राज्य वाटते. ईव्ही व्यतिरिक्त कंपनी भारतात ईव्ही कंपोनंट्सदेखील विकसित करू शकते.

३१ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या वार्षिक अहवालात कंपनीने म्हटले आहे की, दक्षिणपूर्व आशियासाठी EV दुचाकी वाहनांच्या निर्मितीसाठी भारत यावर्षी उत्पादन सुरु करण्यात मदत करेल. या वर्षाच्या सुरुवातीला फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले होते की, “यंग लिऊ यांच्याशी भेट यशस्वी झाली. आमच्या चर्चेत भारताची तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती इको-सिस्टम वाढविण्याच्या उद्देशाने विविध विषयांचा समावेश होता.”

फॉक्सकॉन (Foxconn) ग्रुपच्या भारत FIH ने डिसेंबर २०२१ मध्ये सांगितले होते की त्यांनी एथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिक सारख्या ईव्ही निर्मात्यांसह व्यवसाय सुरू केला आहे. पण कंपनी भारतात ईव्ही वाहने स्वतः एकट्याने की संयुक्त पद्धतीने उत्पादन सुरु करेल हे अद्याप अस्पष्ट आहे.

भारतात Apple च्या विक्री व्यवसायात मोठी वाढ

अगदी कमी काळात Apple च्या भारतातील उलाढालीने वेग घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, Apple च्या भारतातील पहिल्या दोन रिटेल स्टोअर्सनी प्रत्येकी सुमारे २२-२५ कोटींचा विक्री व्यवसाय केला आहे. दिवाळी सारखा सण नसलेल्या काळात देशातील इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरसाठीची ही सर्वाधिक कमाई असल्याचे मानले जात आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ॲपलने गेल्या १९ महिन्यांत १ लाख नवीन थेट नोकऱ्यांची संधी निर्माण केली. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सर्वाधिक नोकरीची संधी निर्माण करणारी ही कंपनी बनली आहे.

हे ही वाचा :

Back to top button