नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतातून थायलंडला जाण्यासाठी आता हवाई मार्गाबरोबरच तुम्हाला कारचा वापरही करता येणार आहे. कारण, त्यासाठी थेट महामार्ग तयार होत आहे. येत्या चार वर्षांमध्ये पूर्ण होऊ घातलेला हा प्रकल्प भारत-म्यानमार-थायलंड अशा तीन देशांमधून जाईल. या प्रकल्पाचा थायलंडमधील भाग बांधून तयार असल्याची माहिती थायलंडचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री विजावत यांनी दिली. तसेच म्यानमारचे वाणिज्यमंत्री औंग नैंग ओ यांनी सांगितले की, येत्या तीन वर्षांत त्यांच्या देशातील भाग बांधून पूर्ण होईल. हा त्रिपक्षीय हायवे बँकॉकमधून सुरू होईल आणि कोलकातापर्यंत असणार आहे. (Travel India To Thailand By Car)
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या हायवेची संकल्पना मांडली होती. एप्रिल 2002 मध्ये यासाठी तीन देशांमध्ये बैठक घेऊन याची संमतीही घेतली होती. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन या प्रकल्पांतर्गत हा महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो द़ृष्टिक्षेपात आल्यानंतर तीन देशांमधील व्यापार आणि दळणवळण वाढणार आहे. शिवाय शेजारील इतर आशियाई देशांनाही या हायवेचा मोठा फायदा होणार आहे.
2,800 कि.मी. लांबी
या महामार्गाची लांबी 2,800 किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे. तो बँकॉकपासून सुरू होऊन पुढे थायलंडमधील सुकोथायस मे सोत या शहरातून जाईल. म्यानमारमधील यांगोन, मांडाले, कालेवा, तामू आणि भारतातील मोरेह, कोहिमा, गुवाहाटी, श्रीरामपूर, सिलिगुडी आणि कोलकाता या शहरांमधून हा हायवे जाणार असून तो कोलकातापर्यंतच असणार आहे.
अधिक वाचा :