MP Sanjay Raut : दोन महिन्यात सरकार कोसळणार; खासदार संजय राऊत यांचा दावा | पुढारी

MP Sanjay Raut : दोन महिन्यात सरकार कोसळणार; खासदार संजय राऊत यांचा दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार येत्या दोन महिन्यात कोसळणार,असा दावा शिवसेना (उबाठा) नेते खा. संजय राऊत यांनी आज (दि.१६) पत्रकार परिषदेतून केला.केंद्राने पर्यायाने भाजपने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रोखला आहे. एकनाथ शिंदेच्या हाती काही नाही.राज्य सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असते तर मंत्रिमंडळ विस्तार रोखला गेला नसता. एक वर्ष झाला तरी विस्तार खोळंबला आहे. शिंदेंचा त्यामुळे खुळखुळा झाला आहे,अशी टीका राऊत यांनी केली. राज्याबाबत कुठलेही निर्णय शिंदे घेवू शकत नाही. मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. भ्रष्ट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार करा असा ‘त्यांचा’ आदेश आहे, असे म्हणत राऊत यांनी केंद्रामुळे विस्तार खोळंबल्याचा दावा केला. ( MP Sanjay Raut )

MP Sanjay Raut : हा कसला फेव्हिकॉलचा जोड?

खा. अनिल बोंडे यांनी शिंदे संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, फडणवीस यांच्या प्रवक्त्याने ‘त्यांना’ बेडकाची उपमा दिली. मग हा फेव्हिकॉलचा जोड म्हणायचा का? गुरूवारच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी एकमेकांकडे बघायलाही तयार नव्हते. हा कसला फेव्हिकॉलचा जोड? हा कुठला जोड वगैरे नाही. पुढील दोन महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल.त्यानंतर सरकार कोसळेल, असे राऊत म्हणाले.

बनाव मुर्ख लोक रचतात, अशा शब्दात राऊत यांनी मयुर शिंदे संदर्भात भाजपने केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.शिंदे सोबत माझे फोटो असले तरी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.आता ते मिंधे गटात आहे,असे  राऊतांनी स्पष्ट केले. हा बनावत असता तर फोन क्रमांकासह पोलिसांना कवळले नसते.अलीकडे धमक्या मिळत आहेत. फोन क्रमांकावरून संबंधिताला ट्रेस करता येते, हे न समजण्याइतके आम्ही दूधखुळे नाही, अशी संताप राऊतांनी व्यक्त केला.

लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचाच हा बनाव

लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचाच हा बनाव आहे. ठाण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांच्या मदतीने मिंधे आणि भाजपमध्ये गेले. गुंड त्यामुळे माझ्यासाठी कशाला काम करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ७२ तासाचे जे जाहिरात कांड झाले त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी काल हा बनाव करण्यात आला,अशी माहिती आहे.मी कधीही पोलिसांकडे सुरक्षा मागितली नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारवर विश्वास कसा ठेवणार? अनेक गुन्हे असलेले गुन्हेगार दबावात गुन्हा कबुल करतात, असा दावा  राऊतांनी केला.

हेही वाचा 

Back to top button