Monsoon Forecast : चिंतेचे ढग दाटले! मान्सूनचा प्रवास पुन्हा लांबणीवर | पुढारी

Monsoon Forecast : चिंतेचे ढग दाटले! मान्सूनचा प्रवास पुन्हा लांबणीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी राज्‍यात मान्सूनची चाहूल नाही. महाराष्ट्रात ११ जूनला पोहचलेल्या मान्सूनने तळकोकणातच आपला तळ ठोकला आहे. त्यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास सध्या थांबला असून, तो आणखी काही दिवस लांबणार (Monsoon Forecast) आहे, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून आज (दि.१५ जून) वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती ‘आयएमडी पुणे’ चे विभागप्रमुख के.एस. होशाळीकर यांनी दिली आहे.

दरवर्षी १ जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा मात्र ७ जूनला दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी रविवारी ११ जून उजाडला. महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन चार दिवस झाले, तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे बळीराजासह लोकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नुकत्याच दिलेल्या अपडेटनुसार, मान्सून शुक्रवार दि. २३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात जोर धरण्याची शक्यता (Monsoon Forecast) आहे, असा अंदाज के. एस. होशाळीकर यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Monsoon Forecast: २५ जूननंतरच मान्सून पुन्हा जोर धरणार…

पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हिमालयापलीकडे न गेल्याने मान्सून अत्यंत क्षीण झाला आहे. सध्या तो तळकोकणात असला, तरीही बिपरजॉय चक्रीवादळाने त्यातील आर्द्रता शोषून घेतली. त्यामुळेही पुढे जाण्याइतका जोर सध्या नाही. त्यामुळे तो २५ जूननंतरच जोर धरेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डाॅ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी बुधवारी ‘पुढारी’शी बाेलताना व्यक्त केला हाेता.

हेही वाचा:

Back to top button