पुणे : मान्सूनपूर्व, मान्सून पाऊस न पडल्याने वाल्हे परिसरात तीव्र पाणीटंचाई | पुढारी

पुणे : मान्सूनपूर्व, मान्सून पाऊस न पडल्याने वाल्हे परिसरात तीव्र पाणीटंचाई

वाल्हे (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  वाल्हे (ता. पुरंदर) गावच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, शासनाच्या माध्यमातून येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. आता या भागात जनावरांच्या चार्‍याचीही भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे परिसरात त्वरित चारा छावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकर्‍यांकडून होत आहे. वाल्हे येथील पूर्वेकडील भागात असलेल्या वाड्या-वस्त्यांसह बहिर्जीचीवाडी, बाळाजीचीवाडी, वागदरवाडी, झापाचीवाडी, गायकवाडवाडी, अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी तसेच सुकलवाडी येथील चव्हाणवस्ती येथे पाणीटंचाईच्या तीव— झळा जाणवत आहेत.

येथील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांकडून टँकर सुरू करण्याची मागणी होत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून वाल्हे ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाडवाडी तसेच वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहिर्जीचीवाडी, झापाचीवाडी येथे टँकर सुरू करण्यात आला होता. यानंतर शासनानेही येथे शासकीय टँकर सुरू केला आहे.

दरम्यान, दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता पाणीटंचाईपाठोपाठ चार्‍यांचाही प्रश्न गंभीर होत आहे. चारा उपलब्धतेअभावी जिवापाड जपलेली जनावरे सांभाळायची कशी? असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडला नसल्याने तसेच आता मान्सून पावसाचा काळ सुरू होऊनदेखील पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासोबतच चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला असून, शासनाने त्वरित येथील वाड्या-वस्त्यांवरील जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याबाबत मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे. येथील ग्रामस्थ जनावरांना चारा छावण्या सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरच संबंधित प्रशासनाकडे देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Back to top button