‘Biparjoy Cyclone’ सारख्या चक्रीवादळांच्या संख्येत पश्चिम किनार्‍यावर वाढ; संशोधनातून निष्कर्ष | पुढारी

'Biparjoy Cyclone' सारख्या चक्रीवादळांच्या संख्येत पश्चिम किनार्‍यावर वाढ; संशोधनातून निष्कर्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात चक्रीवादळाची तीव्रता आणि घटनांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. मागील 50 वर्षांमध्ये भारतात अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळाच्या (Biparjoy Cyclone)  घटनांमध्ये 12 पटीने वाढ नोंदवली गेली आहे. मागील १० वर्षात भारतातील 250 हून अधिक जिल्हे अशा वादळांनी प्रभावित झाले आहेत. यापैकी बहुतेक घटना भारताच्या पूर्व किनार्‍यावर घडल्या आहेत. तर अलीकडच्या काळात पश्चिम किनार्‍यावर अशा घटनांची संख्या वाढू लागली आहे, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.

IITM च्या (Indian Institute of Tropical Meteorology) अभ्यासानुसार, 1982 पासून अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता 52 टक्क्यांनी आणि त्यांचा कालावधी 80 टक्क्यांनी वाढला आहे. चक्रीवादळाच्या या बदलत्या प्रवृत्तीमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत आहे. बिपरजॉय (Biparjoy Cyclone)  या अत्यंत तीव्र चक्रीवादळाचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर झाला आहे. त्यामुळे भारतात मान्सून दाखल होण्यास ८ दिवसांचा विलंब झाला.

भारतात अलीकडेच आलेल्या सर्वात दीर्घकाळ टिकणाऱ्या चक्रीवादळांपैकी बिपरजॉय एक चक्रीवादळ आहे. ज्याचे तीव्र परिणाम होऊ शकतात. चक्रीवादळांचा प्रभाव इतर कोणत्याही हवामानाच्या घटकांपेक्षा अधिक गंभीर असतो. जरी भारताने चक्रीवादळांमुळे होणारी जीवितहानी लक्षणीयरीत्या कमी केली असली तरीही, बिपरजॉयसारख्या गंभीर वादळांसाठी यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे. त्यासाठी संवेदनशील प्रदेशांमध्ये अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे, असे ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेचे (CEEW) कार्यक्रम प्रमुख डॉ. विश्वास चितळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button