Biparjoy Cyclones : अरबी समुद्रात चक्रीवादळाची संख्या का वाढत आहे; जाणून घ्या कारणे

Biparjoy Cyclones : अरबी समुद्रात चक्रीवादळाची संख्या का वाढत आहे; जाणून घ्या कारणे

Published on

अरबी समुद्रात खोलवर तयार झालेल्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हे वादळ महाराष्ट्र, गोवा, केरळ व कर्नाटक या चार राज्यांत धुमाकूळ घालू शकते. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही आठवड्यांपूर्वी मोखा वादळाने धुमाकूळ घातला होता. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कौल यांच्या मते भविष्यात अरबी समुद्रात वादळे येतच राहतील. जाणून घ्या अरबी समुद्रात वादळे येण्याची कारणे काय आहेत. (Cyclones)

भविष्यात अरबी समुद्रात वादळे येतच राहतील; हवामान शास्त्रज्ञ डॉ. कौल यांचा इशारा; सागरी तापमानवाढीचा परिणाम (पूर्व प्रसिद्धी १८ मे २०२१ )

जागतिक तापमानवाढ आणि गेल्या दशकात अरबी समुद्रातील वाढलेले तापमान, यामुळे यापूर्वी शांत समजल्या जाणाऱ्या अरबी समुद्रात सलग चौथ्या वर्षी पावसाळ्यापूर्वी चक्रीवादळ आले. यापुढील काळातही चक्रीवादळे येणार असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर धोका पोहोचू शकतो, असे भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेचे (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कौल यांनी सोमवारी स्पष्ट केले. दैनिक 'पुढारी'ला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश.

प्रश्न : चक्रीवादळाची तीव्रता का वाढत आहे?

डॉ. रॉक्सी मॅथ्यू कौल : सागरी तापमानवाढीमुळे आपल्यासमोर काही आव्हाने उभी राहिली आहेत. चक्रीवादळांची तीव्रता वेगवान करण्याचे काम सागरी तापमानवाढ करते. गेल्या काही वर्षांत 'ओच्छी 'फनी', 'अम्फान' या प्रारंभी कमकुवत असलेल्या चक्रीवादळांचे २४ तासांत तीव्र चक्रीवादळांत रूपांतर झाले होते. अपवादात्मक सागरी तापमानवाढीच्या परिस्थितीमुळे हे घडले. म्हणजे आपण झोपण्यास जातो, तेव्हा कमकुवत चक्रीवादळ निर्माण होत असते, तर सकाळी उठण्याच्या वेळी ते जोरदार चक्रीवादळात परिवर्तित होते. ते आपल्या दारात पोहोचलेले असते. त्याला तोंड देण्यास आपण सिद्ध राहिले पाहिजे.

प्रश्न : 'तोक्ते' चक्रीवादळाची तीव्रता कोठे वाढली?

डॉ. कौल : महाराष्ट्राला धडकलेले 'तोक्ते' चक्रीवादळ गेल्या २४ तासांत मुंबईजवळ अधिक तीव्र झाले. चक्रीवादळामध्ये सागरी तापमानाची भर पडल्याने त्याची तीव्रता वाढली. प्रश्न याचा परिणाम काय होता?

डॉ. कौल : वेगवान वाऱ्यांसोबत पर्जन्यवृष्टी आणि समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ, असा तिहेरी परिणाम यावेळी किनारपट्टीवर होतो. त्यामुळे अशा चक्रीवादळाचा अभ्यास करून जास्तीत जास्त अचूक अंदाज वर्तविला पाहिजे.

प्रश्न : तापमानवाढीचा परिणाम होतो आहे का?

डॉ. कौल : गेल्या शतकापासून अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढ आहे. या दशकात त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या तापमानवाढीचा परिणाम होऊन वारंवार चक्रीवादळे व त्यांची तीव्रता या भागात वाढली. चक्रीवादळाच्या दृष्टीने अरबी समुद्र पूर्वी शांत होता. त्यात आता बदल झाला आहे. चक्रीवादळ, पूर आणि हवामानातील टोकाचे बदल, यामुळे गेल्या पाच दशकांत सुमारे १.४ लाख लोकांनी जीव गमावले.

प्रश्न: अरबी समुद्रात यापूर्वीची वादळे कशी होती?

डॉ. कौल : अरबी समुद्रात चक्रीवादळाचे सलग चौथे वर्ष असून, एप्रिल ते जूनदरम्यान सलग तिसऱ्या वर्षी ते पश्चिम किनारपट्टीवर धडकले आहे. २०१९ मध्ये 'वायू' वादळामुळे गुजरातमध्ये नुकसान झाले. २०२० मध्ये 'निसर्ग' हे पहिले चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले. त्यानंतर आता 'तोक्ते' चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टी व महाराष्ट्रात धडकले आहे. चक्रीवादळासोबत जोरदार वारे आणि अतिवृष्टी यामुळे किनारपट्टीवर मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

प्रश्न : चक्रीवादळाचा अंदाज बांधून मालमत्तेची काळजी घेता येईल का?

डॉ. कौल : अरबी समुद्राची तापमानवाढ ही कायम राहणार आहे. कार्बन उत्सर्जनातील वाढीचा तो परिणाम आहे. त्यामुळे भविष्यात अशी वादळे येतच राहतील. चक्रीवादळ, पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे येणारा पूर तसेच समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ याला तोंड देण्याच्या तयारीत आपण असले पाहिजे. आपण करीत असलेल्या अभ्यासाद्वारे येत्या दशकात येणाऱ्या चक्रीवादळांचा अंदाज आपण बांधू शकतो. त्याचा भारतीय किनारपट्टीवर कसा परिणाम होतो आहे, ते लक्षात घेत आपण उपाय योजले पाहिजेत. या जोखमीचे मूल्यमापन करून आपण प्राणहानी आणि मालमत्तेचे रक्षण करू शकू.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news