

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात परिवर्तन आणण्यासाठी संघटन मजबुतीची गरज व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि.१०) माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल आणि खा.सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली. पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील पक्ष मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलतांना पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) संघटनात्मक घोषणा केल्या.
उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी 'शरद पवार, सुप्रिया सुळे जिंदाबाद'ची घोषणाबाजी (NCP Chief Sharad Pawar) केली. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित संघटनात्मक घोषणा करण्यात आल्या. कार्यक्रमानंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता पवारांनी कार्यक्रमस्थळ सोडल्याने ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजधानीत रंगली होती. पंरतु,'दादा' नाराज नसल्याची सारवासारव पक्षाच्या नेत्यांनी केली.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड तसेच राज्यसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रासह हरियाणा,पंजाब, महिला, युवक, युवती तसेच लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन घोषणांमध्ये अजित पवारांकडे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. दरम्यान, खा. सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशातील शेतकरी संकटात आहे. नवीन पिढीसमोर बेरोजगारीची समस्या आहे. तरुण हताश आहेत. अशात सत्ताधारी आपल्या हिताचे संरक्षण करू शकत नाहीत, याची जाणीव शेतकरी, तरूण, महिला, आदिवासी, दलित बांधवांना आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमातून पवारांनी केले. जनता जागरूक झाल्याने अनेक राज्यात बदल दिसून येत आहे. देशाच्या नकाशावरुन ही स्थिती स्पष्ट होते. अनेक राज्यात भाजप सत्तेत नाही. ज्या राज्यात भाजप सत्तेवर आहे, त्या राज्यात चुकीच्या पद्धतीने ते सत्तेत आले आहेत. त्यामुळे चुकीचे काम करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
देशात कडवटपणा पसरवण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. भाजप सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये महिला, अल्पसंख्यांक तसेच दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अशात विरोधक एकत्रित येवून एक निश्चित कार्यक्रम देशासमोर ठेवणार असल्याचे सांगत तरुण, महिला, युवती, युवक, अल्पसंख्यांकांसोबत मिळून देशात बदल घडवून आणू, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार निघून गेले. परंतु, ते नाराज नाहीत, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभा तसेच काही राज्यांसह संघटनात्मक कार्याच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. हे नेते पक्ष वाढीसाठी कार्य करतील. देशभरात पक्ष विस्तारासाठी दोन कार्याध्यक्षांची गरज होती, अशी स्पष्टोक्ती भुजबळ यांनी दिली.
शरद पवारच पक्षाचे नेतृत्व करीत आहेत आणि करत राहतील. दोन कार्याध्यक्षांच्या नियुक्तीनंतर यासंदर्भात वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. २०२४ मध्ये होवू घातलेल्या लोकसभेच्या आव्हानात्मक निवडणुकीला समोर जाण्यासाठी पवार विरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशात पक्षाची संघटनात्मक बांधणी तेवढ्याच ताकदीने होण्याची आवश्यकता होती. प्रफुल्ल पटेलांच्या ४ दशकांचा राजकीय अनुभव आणि सुप्रिया सुळे यांचा दिल्लीतील अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे कार्याध्यक्षपद देण्यात आल्याचे पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय महासचिव सुनील तटकरे यांनी सांगितले. दोन कार्यकारी अध्यक्ष नेमून राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत उत्तम पद्धतीने संतुलन साधले आहे. महाराष्ट्रातील संघटन हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मजबूत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या २४ वर्षांपासून मेहनत घेत आहेत. काम करण्याची विलक्षण हातोटी असलेल्या अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून पाहिले जाते. अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय राज्यात पक्षाची संघटना आहेच. सामुदायिकरित्या आम्ही सर्वजण काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे तटकरे म्हणाले.
१) सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव पदासह ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.राष्ट्रीय कार्यक्रम, सत्र तसेच शेतकरी, अल्पसंख्यांक संबंधी प्रश्नांकडे ही लक्ष देतील .
२) जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, कर्नाटक या राज्यांसह अनुसूचित जाती, जमाती संबंधीत प्रश्नांची जबाबदारी
३) डॉ. योगानंद शास्त्री यांच्याकडे संघटन,सेवा दल तसेच दिल्ली अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
४) के.के.शर्मा हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव असतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच हिमाचलची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
५) पी.पी.मोहम्मद फैजल यांच्याकडे तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ राज्याची जबाबदारी
६) नरेंद्र वर्मा यांच्याकडे ईशान्य भारतासह प्रसारमाध्यम तसेच आयटी विभागाची जबाबदारी
७) एस.आर.कोहली यांच्याकडे पटेल आणि सुळे यांना राज्यांमध्ये मदत करण्याचे कार्य शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगासोबत समन्वयाचे कार्य देण्यात आले आहे.
८) नसीम सिद्दीकी यांच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार आणि गोवाची जबाबदारी
हेही वाचा