Delhi: दिल्लीतील बाल रूग्णालयाला आग; २० नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हलवले | पुढारी

Delhi: दिल्लीतील बाल रूग्णालयाला आग; २० नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हलवले

पुढारी ऑनलाईन: दिल्लीमधील वैशाली कॉलनीतील जनकपुरी भागातील एका बाल रूग्णालयाला आज गुरूवारी (दि.०८) मध्यरात्री आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान रूग्णालयातील २० नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले असून, ते सुरक्षित आहेत. या नवजात बालकांना जवळच्या रुग्णालयात हलवले असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती येथील पोलिस प्रशासनाने दिली आहे.

नवी दिल्लीतील न्यू बॉर्न चाइल्ड हॉस्पिटलची तीन मजली इमारत असून, पहिल्या मजल्यावर हे हॉस्पिटल आहे. ही आग तळघरात लागली आणि त्यानंतर रुग्णालयाच्या इतर मजल्यांवर पसरली, त्यात फर्निचर, कागदपत्रे आणि दुकानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान २० नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले. यामधील १३ नवजात बालकांना जनकपुरी येथील आर्य रुग्णालयात हलविण्यात आले, तर दोघांना द्वारका मोरे नवजात बालक रुग्णालयात नेण्यात आले. दोन नवजात बालकांना जनकपुरी येथील जेके रुग्णालयात नेण्यात आले आणि इतर तिघांना वैशाली येथील नवजात बालक रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले की,  गुरूवारी रात्री ११.३५ वाजता एका इस्पितळात आग लागल्याचा फोन आला. आम्ही प्रथम चार अग्निशमन दल पाठवले. त्यांनी आम्हाला सांगितले की तेथे २० नवजात बालके आहेत आणि लेन अरुंद असल्याने त्यांना अडचण येत आहे. त्यानंतर आणखी चार अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. आम्ही वेळेवर तिथे पोहोचलो आणि आग विझवण्यात आली. सर्व मुलांना वाचवून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आग कशाने लागली हे अद्याप समजलेले नाही, मात्र पुढील तपास केला जात असल्याचे वृत्त एएनआयला दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button