“देशातील राजकारणावर विदेशात…” परराष्ट्र मंत्र्यांचा राहुल गांधींना सल्‍ला | पुढारी

"देशातील राजकारणावर विदेशात..." परराष्ट्र मंत्र्यांचा राहुल गांधींना सल्‍ला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विदेश दौऱ्यादरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्याचा आज ( दि.८ ) परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर ( S Jaishankar ) यांनी खरपुस समाचार घेतला. देशातील राजकारणावर विदेशात भाष्य करणे देशहिताचे नाही,असा सल्ला देखील परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गत ९ वर्षातील केंद्राच्या परराष्ट्र धोरणासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध मुद्दयांवर भूमिका स्पष्ट केली.

देशात लोकशाही अस्तित्वात नसेल तर, प्रत्येक निवडणुकीचा निकाल एकच असायला हवा होता; पंरतु २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सारखाच राहील, हे आम्हाला ठावूक आहे, असे स्पष्ट करीत जयशंकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हीच विजयी होवू असा अप्रत्यक्ष संदेश विरोधकांना दिले.

राहुल गांधी जेव्हा ही विदेशात जातात तेव्हा ते देशावर टीका करतात. देशातील राजकारणावर मतप्रदर्शित करतात. देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कधी एक पक्ष विजयी होतो, तर कधी दुसरा पक्षाचा विजय होतो. लोकशाहीच नसती तर हे कस शक्य झाले असते? असा सवाल नाव न घेता जयशंकर यांनी राहुल गांधींना विचारला.

राहुल गांधींचे ‘नॅरेटिव्ह’ जेव्हा देशात काम करीत नाही तेव्हा विदेशात ते त्याचा वापर करतात. विदेशातील समर्थन देशात चालेल अशी त्यांना अपेक्षा आहे. मात्र, देशात काहीही केले तरी त्यावर आम्हाला आक्षेप नाही. देशाचे राजकारण बाहेर घेवून जाणे देशहिताचे नाही. त्यांची विश्वसनीयता त्यामुळे गमावली आहे, असा टोलाही जयशंकर यांनी लगावला.

 S Jaishankar : जगासाठी भारत ‘विकास भागीदार’

देशाची गेल्या ९ वर्षाच्या परराष्ट्र धोरणाची फलश्रृती म्हणजे जग भारताकडे ‘विकास भागीदार’ म्हणून बघतोय. जग विशेषत: ग्लोबल साऊथ, भारताला एक विश्वसनीय आणि प्रभावी विकास भागीदार म्हणून बघत आहे. अर्थव्यवस्थेवर महत्वपूर्ण प्रभाव भारत टाकत असून, हे जगानेही मान्य केले असल्याचे जयशंकर म्हणाले. आपल्या मित्र देशांसोबत त्यांच्या प्राथमिकतेनूसार भारत काम करतो. भारताची एक आर्थिक सहकारी म्हणून प्रतिमा बनली असल्याचे ते म्हणाले.कोरोना दरम्यान अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. पंरतु, भारताने जवळपास ७० लाख भारतीयांना मायदेशी आणले होते, असेही डॉ.जयशंकर म्हणाले.

यूरेशियातील स्थिरता महत्वाची

रशिया-युक्रेन युद्धाचा वेगवेगळ्या देशावर वेगवेगळा प्रभाव पडला आहे.रशिया, चीन अथवा इतर देशांवर या युद्धाचा काय प्रभाव पडेल ते स्व:त ठरवतील.१९५५ नंतर जगभरात अनेक घडामोडी घडल्या.पंरतु, भारत आणि रशियाचे संबंध स्थिर आहेत.यूरेशियाची स्थिरता या दोन बड्या देशाच्या संबंधांवर अवलंबून असल्याची जाणिव या देशांना असल्याचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

कॅनडाला खडसावले

कॅनडातील एका कार्यक्रमात देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा देखावा प्रदर्शित केल्याप्रकरणी जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा घटना दोन देशाच्या संबंधांसाठी चांगल्या नाही. केवळ ‘व्होट बॅंकेच्या’ राजकारणासाठी हे करण्यात आल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. फुटीरतावादी, अतिरेकी तसेच हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या संबंधित कुठलातरी मोठा मुद्दा याप्रकरणात सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

 

Back to top button