Odisha Train Accident: रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, FIR दाखल | पुढारी

Odisha Train Accident: रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, FIR दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार येथे झालेल्या रेल्वे अपघाताबाबत गुन्हा नोंदवला आहे. रेल्वे मंत्रालयाची शिफारस, ओडिशा सरकारची संमती आणि केंद्र सरकारच्या आदेशानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

2 जून 2023 रोजी ओडिशा राज्यातील बहनगा बाजार येथे कोरोमंडल एक्स्प्रेस, यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला होता. ज्यात 278 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. मंगळवारी सीबीआयचे पथक बालासोर येथे पोहोचले आणि त्यांनी अपघातस्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. याबाबतची माहिती एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

सीबीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि एका मालगाडीच्या भिषण अपघात प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या विनंतीवरून, ओडिशा सरकारची संमती आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम्ही तपासाला सुरुवात केली आहे. यातील पहिला भाग म्हणजे सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. (Odisha Train Accident)

सीबीआयच्या पथकाने मंगळवारी सिग्नल रूम आणि रेल्वे रुळांची पाहणी केली. बहनगा बाजार रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांचीही चौकशी केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. फॉरेन्सिक टीमने सिग्नल रूमच्या कर्मचार्‍यांशीही बोलून उपकरणांचा वापर आणि त्यांच्या कामाच्या पद्धतींविषयी माहिती घेतली.

या अपघातामागे बाह्य हस्तक्षेप असण्याची शक्यता रेल्वेने व्यक्त केल्याने सीबीआय अपघाताचा गुन्हेगारी दृष्टिकोनातून तपास करणार आहे. या अपघातानंतर, 3 जून रोजी, ओडिशा पोलिसांनी बालोसर सरकारी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बदलल्यामुळे हा अपघात झाल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते.

विशेष म्हणजे हा भीषण अपघात 2 जून रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार रेल्वे स्थानकावर घडला. त्यानंतर चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे मालगाडीला धडकले आणि रुळावरून घसरले. त्याचवेळी बंगळूर-हावडा एक्स्प्रेसही तेथून जात होती. कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे बंगळूर-हावडा एक्स्प्रेसला धडकले.

Back to top button