Odisha train accident | ओडिशा रेल्वे दुर्घटना! तांत्रिक की मानवी चूक?, एक्स्प्रेसचा ट्रॅक कसा चूकला, प्राथमिक अहवाल काय सांगतो? | पुढारी

Odisha train accident | ओडिशा रेल्वे दुर्घटना! तांत्रिक की मानवी चूक?, एक्स्प्रेसचा ट्रॅक कसा चूकला, प्राथमिक अहवाल काय सांगतो?

पुढारी ऑनलाईन : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले. हा अपघात मानवी चुकांमुळे झाला असावा, अशी शक्यता रेल्वेच्या सिग्नलिंग कंट्रोल रूमच्या प्राथमिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वेच्या खरगपूर विभागाच्या सिग्नलिंग कंट्रोल रूमच्या व्हिडिओ फुटेजनुसार, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी ट्रेनने चुकीच्या ट्रॅकने प्रवास केला. शुक्रवारी सायंकाळी ६:५५ च्या सुमारास बहानगर बाजार स्टेशनमधून पुढे गेल्यानंतर चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गाने जाण्याऐवजी चुकून एका लूप लाइनमध्ये घुसली; ज्यावर एक मालगाडी उभी होती. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक व्यापक तपासाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Odisha train accident)

दोन दशकांहून अधिक काळातील भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे. पण हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकांमुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

”हा अपघात कसा घडला, हे रेल्वे बोर्डाच्या सविस्तर चौकशीत कळेल. पण प्रथमदर्शनी ही मानवी चूक असल्याचे दिसते,” असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. याच अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, १९९५ मध्ये उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये असाच एक अपघात झाला होता, ज्यामध्ये तीन गाड्यांचा समावेश होता. त्या अपघातात सुमारे ३५० लोकांचा मृत्यू झाला होता आणि बचावकार्य तीन दिवस चालले होते. (Odisha triple train crash)

ताशी १२७ किमी वेगाने धावणारी कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली आणि मुख्य मार्गावर रुळावरून घसरली, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. यानंतर काही मिनिटांतच विरुद्ध दिशेने येणारी हावडाकडे जाणारी यशवंतनगर एक्स्प्रेस कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकली. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६१ वर पोहोचली असून घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्याने शनिवारी दिली. (Odisha train accident)

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

दरम्यान, बालासोर रेल्वे दुर्घटनेसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. तसेच आज पंतप्रधान मोदी आज ओडिशा जाऊन घटनास्थळी भेट देणार आहेत.

हे ही वाचा :

Back to top button