पुढारी ऑनलाइन डेस्क : Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांचा शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात २८८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ६५० वर लोक जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमका कसा घडला. तीन गाड्यांचे डबे एकमेकांवर कसे आदळले. कोणत्या गाडीचे डबे पहिले रेल्वे रुळावरून घसरले, जाणून घ्या अपघात नेमका कसा घडला याची सविस्तर माहिती…
या अपघातात एकूण तीन गाड्यांचे डबे एकमेकांवर आदळले आहेत. मात्र, पहिले कोणत्या गाडीचे डबे रुळावरून घसरले याबाबत संभ्रम आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हावडाला जाणाऱ्या १२८६४ बेंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचे डबे बाहानगा बाजार येथे रूळावरून घसरून दुसऱ्या रूळावर जाऊन पडले. दुसऱ्या रुळावर जाऊन पडलेले हे डबे १२८४१ या शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. त्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसचे डबेही रेल्वे रूळावरून घसरले आणि पलीकडे थांबलेल्या मालगाडीवर जाऊन आदळले. त्यामुळे मालगाडीसुद्धा या दुर्घटनेत अडकली. Odisha Train Accident
मात्र, रेल्वे प्रवक्ता अमिताभ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले कोरोमंडल एक्सप्रेसचे १० ते १२ डबे रूळावरून घसरले आणि ते पलीकडून येणाऱ्या बेंगळुरू-हावडा एक्सप्रेसच्या रूळावर जाऊन पडले. नंतर मालगाडीवर जाऊन आदळले.
तर रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ट्रेन नंबर १२८४१ जी शालीमार ते चेन्नई जात होती. ही ट्रेन २ जूनला दुपारी ३.३० वाजता शालीमार स्टेशनवरून निघाली. ती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खडगपूर डिविजन अंतर्गत येणाऱ्या बाहानगा बाजार रेल्वे स्टेशन जवळ पोहोचली तेव्हा या गाडीचे १० ते १२ डबे रेल्वे रुळावरून घसरले. ते डबे शेजारील रूळावर उलटले. याच रुळावरून थोड्याच वेळात ट्रेन नंबर १२८६४ बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस निघाली ती कोरोमंडल एक्सप्रेसच्या या घसरलेल्या डब्यांना जाऊन धडकली. ही धडक इतकी प्रचंड जोरदार होती की या गाडीचे डेबे देखील रेल्वे रुळावरून घसरून पलीकडील मालगाडीवर जाऊन आदळले.
हे ही वाचा