पुढारी ऑनलाईन : कोणत्याही कारणाशिवाय वैवाहिक जोडीदाराला दीर्घकाळ शारिरिक संबंध ठेवण्यास नकार देणे ही एक मानसिक क्रूरता आहे, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) नोंदवले आहे. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्याच्या विरोधात एका पुरुषाने दाखल केलेल्या अपीलवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हे मत नोंदवले आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले की, नोंदीवरुन हे स्पष्ट होते की वैवाहिक जोडीदार फार काळापासून वेगळे राहत आहेत आणि पत्नीने वैवाहिक दायित्वाची जबाबदारी पार पाडण्यास नकार दिला. १९७९ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. सात वर्षानंतर प्रथेनुसार पत्नीचा गौण सोहळा पार पडला आणि ते वैवाहिक जोडपे म्हणून एकत्र राहू लागले. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने तिचे वैवाहिक जीवनाचे दायित्व पूर्ण करण्यास नकार दिला आणि नंतर ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली.
पतीने असा दावा केला की, त्याने तिला समजवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र तिने पतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाहीत. जुलै १९९४ मध्ये पतीने पत्नीला २२ हजार रुपयांची पोटगी दिल्यानंतर दोघे पंचायतीसमोर परस्पर सहमतीने वेगळे झाले. नंतर तिने दुसरे लग्न केले.
त्यानंतर पतीने मानसिक क्रूरता आणि त्यागाचे कारण पुढे करत घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, मानसिक क्रूरतेच्या आधारावर ट्रायल कोर्टाने घटस्फोट देण्यास नकार दिला. त्यानंतर व्यथित झालेल्या सदर व्यक्तीने घटस्फोटाची याचिका फेटाळणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले.
न्यायमूर्ती सुनीत कुमार (Justices Suneet Kumar) आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार (IV) यांच्या खंडपीठाने पतीचा घटस्फोटाचा आदेश मंजूर करताना म्हटले आहे की, "निःसंशयपणे, पुरेशा कारणाशिवाय पत्नीने त्याच्या जोडीदाराला दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी न देणे ही एक मानसिक क्रूरता आहे. पत्नीला त्याच्या जोडीदारासोबत जीवन पुन्हा सुरू करण्यास भाग पाडता येईल असा कोणताही स्वीकारार्ह दृष्टिकोन नाही."
कौटुंबिक न्यायालयाच्या दृष्टिकोनाला "हायपर-टेक्निकल" असे उद्देशून खंडपीठाने म्हटले की, "या नोंदीवरून असे दिसून आले आहे की दीर्घकाळापासून दोघे वेगळे राहत आहेत. जोडीदाराला वैवाहिक नात्याबद्दल आदर नाही आणि वैवाहिक दायित्वाचे (marital liability) पालन करण्यासही नकार दिला. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे खंडित झाले आहे."
हे ही वाचा :