

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या आत्महत्येच्या कारणाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. तरुणीने आत्महत्या केली त्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीतील मजकुरामुळे या आत्महत्येमागच कारण पोलिसांना सापडले आहे.
वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी डॉ. वैशाली चौधरीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. हे दोन्ही डॉक्टर TMU मधूनच पास आउट झाले आहेत. आशिष जाखर आणि समर्थ जोहरी अशी त्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर IPC 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वैशालीचे वडील प्रमोद चौधरी यांनी पाकब्रा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांची मुलगी आशिष जाखार आणि समर्थ जोहरी यांच्या संपर्कात होती. या दोघांच्यामुळे अस्वस्थ होऊन तिने आत्महत्या केली. असल्याच त्यांनी म्हटल आहे.
हापुडच्या शिव नगर कॉलनीत राहणाऱ्या डॉ. वैशाली चौधरी, TMU मध्ये MDS च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी होत्या. वैशालीचा मृतदेह सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुलींच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक 337 मध्ये दोन मुलींसह राहत होती. सोमवारी सकाळी डॉ. वैशालीचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला.
पोलिसांनी वैशालीच्या खोलीची झडती घेतली. यावेळी पोलिसांना रजिस्टरमधून एक कागद सापडला. हा कागद फॉइलमध्ये ठेवला होता. यावर 'आशिष लव वैशाली' इंग्रजीमध्ये 200 वेळा लिहिले होते. आशिषचे पूर्ण नाव डॉ.आशिष जाखर असल्याचे पोलिसांना तपासात समजले आहे. त्याने TMU मधून 2019 मध्ये MBBS केले आहे.
डॉ.आशिष जाखड हे सुद्धा हापुडचे रहिवासी आहेत. वैशाली आणि आशिष एकत्र TMU मध्ये आले होते. आशिषने एमबीबीएस आणि वैशालीने बीडीएसमध्ये प्रवेश घेतला होता. या काळात दोघेही एकत्र आले होते. त्यावेळी या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. पण MBBS नंतर आशिष दिल्लीला शिफ्ट झाला आणि वैशालीने TMU मध्येच MDS साठी प्रवेश घेतला. डॉ. वैशाली चौधरीला आशिषशी लग्न करायचे होते. पण आशिष लग्नाला नकार देत होता. यामुळे ती गेल्या एक वर्षापासून तणावाखाली राहत होती. अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.