भारत-ऑस्ट्रेलिया मैत्री ‘३D’ वरआधारीत : पंतप्रधान मोदी | पुढारी

भारत-ऑस्ट्रेलिया मैत्री '३D' वरआधारीत : पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-ऑस्ट्रेलियाची मैत्री ‘लोकशाही, दोस्ती आणि डायस्पोरा’ या ‘३D’ वर आधारीत आहे. दोन्ही देशांचे संबंध ऐतिहासिक आहेत. हिंदी महासागराने आपल्याला जोडले आहे. भारतात हजारो वर्षांची जिवंत संस्कृती आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्‍ट्रेलिया-भारतामधील ऐतिहासिक मैत्रीचे स्‍मरण केले.

पंतप्रधान मोदी दोन दिवस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. आज ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे त्यांनी २० हजार भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाची मैत्री कॉमनवेल्थ आणि क्रिकेटद्वारे ओळखली जात होती. नंतर दोन्ही देशाच्या मैत्रीची व्याख्या ‘लोकशाही, डायस्पोरा आणि दोस्ती’ अशी केली आहे; पण माझा विश्वास आहे की, भारत-ऑस्ट्रेलियाचे नाते या पलीकडे आहे, ते परस्पर विश्वास आणि परस्पर आदराचे आहे. आपली जीवनशैली वेगळी असू शकते. क्रिकेटमुळे आपण खूप दिवसांपासून जोडलेलो आहोत. आता योगा, टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडत आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताविषयी प्रेम आहे. भाषा अनेक आहेत; पण आपण एक आहोत. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये परस्पर विश्वास आणि आदर केवळ राजनैतिक संबंधांमुळे विकसित झाला नाही, तर याचे कारण, ऑस्ट्रेलियात राहणारे सर्व भारतीय आहेत. आज IMF भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत एक उज्ज्वल स्थान मानते. जागतिक बॅंकेने भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे. आज अनेक देशांतील बँकिंग व्यवस्था अडचणीत आहे.  पण दुसरीकडे, भारतातील बँकांच्या ताकदीचे सर्वत्र कौतुक होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी बॉस आहेत : अल्बानीज

सिडनी येथील कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदी हे बॉस आहेत असे म्हटले आहे. जेव्हा मी मार्चमध्ये भारतात होतो, तेव्हा तो अविस्मरणीय क्षणांनी भरलेला प्रवास होता, गुजरातमध्ये होळी साजरी करणे, दिल्लीत महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण करणे, मी जिथेही गेलो, तिथे मला ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमध्ये घट्ट नाते जाणवले. तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर ट्रेन आणि बसने प्रवास करा, असे अल्बानीज यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button