निकालापूर्वीच काळाचा घाला!, 'तो' दहावीत 'टॉपर' ठरला आणि जीवनदान देण्‍यातही.... | पुढारी

निकालापूर्वीच काळाचा घाला!, 'तो' दहावीत 'टॉपर' ठरला आणि जीवनदान देण्‍यातही....

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : असे म्‍हणतात, जन्‍म आणि मृत्‍यू यांच्‍यात काही क्षणांच अंतर असते. कारण अनेकवेळा आपण पाहतो अगदी काही क्षणात होत्‍याच नव्‍हतं होतं. सारं काही सुरुळीत सुरु असताना दुर्घटना होते आणि सारं काही संपतं. असा अनुभव केरळच्या तिरुवनंतपुरममधील  बिनेश कुमार आणि रजनीश या दाम्‍पत्‍याला आला. त्‍यांचा मुलगा सारंग याने दहावीच्‍या परीक्षा दिली. मात्र निकाल जाहीर होण्‍यापूर्वीच त्‍याला जीवघेणा अपघात झाला. त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर जाहीर झालेल्‍या निकालात सारंग टॉपर आला. तसेच तो ६ जणांना जीवनदान देणाराही ठरला. त्‍याच्‍या पालकांनी घेतलेल्‍या देहदानाच्‍या ( Organ Donation) निर्णयामुळे सारंग आता ‘देह’ रुपी उराला असून, त्‍याच्‍या कुटुंबीयांनी दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही धैर्याचे घेतलेल्‍या निर्णयाचे संपूर्ण केरळमध्‍ये कौतूक होत आहे.

बीआर सारंग हा बिनेश कुमार आणि रजनीश यांचा १६ वर्षांचा मुलगा. तो अटिंगल येथील शाळेत दहावीच्‍या वर्गात होता. अभ्‍यास अत्‍यंत हुशार असणार्‍या सारंगने दहावीची परीक्षा दिली होती. चांगले गुण मिळणार, असा विश्‍वासही त्‍याने व्‍यक्‍त केला होता. मात्र ६ मे रोजी तो आपल्‍या आईसमवेत वडक्कोटुकव येथील कुननथुकोनम येथे रिक्षाने जात होता. यावेळी झालेल्‍या अपघातात तो गंभीर जखमी झाला. दहावीच्‍या निकालापूर्वीच उपचार सुरु असताना त्‍याचे निधन झाले. सर्व विषयात त्‍याने A+ मिळवले. मात्र हा निकाल ऐकण्‍यासाठी सारंग नव्‍हता.

शिक्षण मंत्री शिवनकुट्टी यांनाही झाले अश्रू अनावर

बुधवार १७ मे रोजी केरळमधील माध्‍यमिक बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यावेळी राज्‍याचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी सारंग याने सर्वच विषयात टॉप केल्‍याचे सांगितले. सारंग याने सर्व विषयांसाठी ग्रेस गुणांशिवाय पूर्ण ए प्लस ग्रेड मिळवला आहे, असे सांगताना त्‍यांना अश्रू अनावर झाले.

Organ Donation :  समाजाला मिळेल प्रोत्‍साहन : शिक्षणमंत्री

दहावीची परीक्षा झाल्‍यानंतर सारंग अपघातात जखमी झाला होता. उपचार सुरु असताना त्‍याचा मृत्‍यू झाला. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही सारंग याच्‍या आई-वडिलांनी आपल्‍या मुलाचे अवयव दान करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यांच्‍या या निर्णयामुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे. सारंग याच्‍या कुटुंबाने घेतलेल्‍या अवयव दानाच्या निर्णयामुळे समाजाला समाजसेवेसाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वासही शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button