‘आधी तुमचा नियम तपासा…” : रशियाकडून कच्‍चे तेल खरेदीवर परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांनी युरोपियन युनियनला ठणकावले

‘आधी तुमचा नियम तपासा…” : रशियाकडून कच्‍चे तेल खरेदीवर परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांनी युरोपियन युनियनला ठणकावले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युरोपियन युनियचे नियम पाहता रशियन कच्‍चे तेल मोठ्या प्रमाणावर तिसर्‍या देशांमध्‍ये वळवले गेले आहे. ते आता रशियन मानले जात नाही. त्‍यामुळे आता युरोपियन युनियनने स्‍वत:चा नियम तपासावा, अशा शब्‍दांमध्‍ये भारताचे परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर ( External Affairs Minister S Jaishankar ) यांनी युरोपियन युनियनला खडसावले. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्‍यानंतर भारताने रशियाकडून कच्‍चे तेल खरेदी कायम ठेवली. यावर पुन्हा एकदा युरोपियन युनियनच्या ( European Union) परराष्ट्र धोरण प्रमुखांनी प्रश्न उपस्थित केला. त्‍याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या युद्धानंतर अनेक देशांनी संतप्त होऊन रशियावर निर्बंध लादले. दरम्यान, भारताने युराेपातील देशांचा दबाव झुगारत रशियाकडून कच्‍चे तेल खरेदी कायम ठेवली. याला सुरुवातीपासून युरोपियन युनियनने आक्षेप घेतला आहे.

काय म्‍हणाले होते 'EU' परराष्‍ट्र धोरणाचे प्रमुख ?

युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल म्हणाले होते की, भारत रशियन तेलाचे रिफाइंड इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेलमध्ये रूपांतर करून युरोपमध्ये विकत आहे. यासाठी युरोपियन युनियनने भारतावर कारवाई करावी. जेथे पाश्चात्य देश रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावरील कारवाई तीव्र करत आहेत. त्यावर दबाव आणत आहेत. दुसरीकडे भारत रशियाकडून कच्‍चे तेल खरेदी करत आहे. त्यांची कोणतीही तक्रार नाही. पण, रशियन तेलापासून भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांवर युरोपीय संघाने कारवाई करावी, अशी मागणीही त्‍यांनी यावेळी केली होती.

External Affairs Minister Jaishankar यांनी दिले सडेतोड प्रत्‍युत्तर

याला उत्तर देताना भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी जोसेफ यांना युरोपियन युनियनने कौन्सिलच्या नियमांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. जयशंकर म्हणाले की, युरोपियन युनियनच्‍या कौन्सिलचे नियम पाहता रशियन कच्चे तेल मोठ्या प्रमाणात तिसऱ्या देशांमध्ये वळवले गेले आहे. ते आता रशियन मानले जात नाही. त्याच वेळी त्यांनी कौन्सिलचे नियमन 833/2014 पाहावा, असा सल्‍लाही  दिला. या बैठकीला जयशंकर यांच्यासोबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हेही उपस्थित होते.

भारत आणि युरोप मित्र…

युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी ब्रुसेल्समधील बिझनेस टेक्नॉलॉजी टॉक्समध्ये जयशंकर यांची भेट घेतली होती, परंतु त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहिले नाहीत. त्याचवेळी पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी युरोपियन युनियलनला खडेबोल सुनावले. यावर युरोपियन युनियनच्या कार्यकारी उपाध्यक्ष मार्गरेट वेस्टेजर म्हणाल्या की, भारत आणि युरोप हे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांशी सामान्य संबंध ठेवले पाहिजेत. त्‍यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करु नयेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news