नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. 17) बंगळूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून त्यातच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा करतील. मंगळवारी संध्याकाळी सीएम पदाचे दोन्ही दावेदार डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी खर्गे यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांना 50-50 फॉर्म्युला मान्य नसल्याचे समजते आहे.
खर्गे आता सोनिया गांधी यांना दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत अहवाल देतील. त्यांनंतर राहुल-सोनिया यांच्याशी बोलल्यानंतर ते उद्या (दि. 17) बेंगळुरूला जाणार आहेत. दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त मिळते आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून याबाबतची घोषणा उद्या केली जाईल असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. (Karnataka CM)
डीके शिवकुमार यांची संघटनात्मक क्षमता पाहता त्यांना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले जाण्याचीही चर्चा रंगली आहे. सिद्धरामय्या यांनी तीन वर्षे मुख्यमंत्री राहावे आणि त्यानंतर शिवकुमार यांच्याकडे खुर्ची सोपवावी, असाही प्रस्ताव मांडण्यात आल्याचे समजत आहे. मात्र यामध्ये कोणताही वाद होऊ नये. सिद्धरामय्या यांनी ठरलेल्या वेळी खुर्ची सोडायची हे सर्व काही आधीच ठरवले पाहिजे, अशी डीके यांची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी मंगळवारी दुपारी 12.30 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांनीही सकाळी काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली. त्यांच्यात काय चर्चा झाली हे अजूनही समजू शकलेले नाही. पण निम्म्यापेक्षा जास्त आमदारांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठींबा दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे.