Karnataka CM decision | डी. के. शिवकुमार यांचा माघारीचा सूर, म्हणाले, 'मला कुणालाही काँग्रेसपासून वेगळे करायचे नाही'

पुढारी ऑनलाईन : मी एक जबाबदार व्यक्ती आहे. मी कोणावर पाठीमागून वार किंवा ब्लॅकमेल करणार नाही. मला चुकीच्या इतिहासाकडे जायचे नाही. काँग्रेस हे आमचे एकसंध घर आहे. यापासून मला कोणाही वेगळे करायचे नाही, अशी भावना व्यक्त करत कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याचे संकेत दिले आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
पुढे बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, सोनिया गांधी आमच्या आदर्श आहेत. काँग्रेस हे प्रत्येकासाठी कुटुंब आहे. आपली राज्यघटना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण सर्वांचे हित जपले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत २० जागा जिंकणे हे आमचे पुढचे आव्हान आहे. कोणतेही चुकीचे वक्तव्य करून मला पुढे जायचे नाही. असे देखील त्यांनी म्हटले आहे.
“Will not backstab, blackmail…” DK Shivakumar before flying to Delhi for next Karnataka CM talks
Read @ANI Story | https://t.co/v128tDZ0bw#DKShivakumar #KarnatakaCM #Karnataka #Delhi #Congress pic.twitter.com/F25NGPFNiM
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2023
कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? सिद्धरामय्या की शिवकुमार? याचा फैसला करण्याची कठीण जबाबदारी पक्षाध्यक्षांवर सोपवण्यात आल्यानंतर सोमवारी राजकीय घडामोडींना वेग आला. या दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार सिद्धरामय्या दिल्लीला पोहोचले, मात्र पोटदुखी आणि उच्च रक्तदाबाचे कारण देत शिवकुमार बंगळूरमध्येच थांबले. दरम्यान, पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या आणि नंतरची तीन वर्षे शिवकुमार मुख्यमंत्रिपदावर राहतील, हा फॉर्म्युला शिवकुमार यांनी फेटाळल्याचे सूत्रांनी सांगितले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? यावरुन अजूनही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (Karnataka Congress president DK Shivakumar) आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कालच दिल्लीत दाखल होऊन तेथे तळ ठोकून आहेत. तर शिवकुमार पोटदुखीने त्रस्त असल्याने बंगळूरमध्ये राहिले. शिवकुमार काल दिल्लीला गेले नसल्याने राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले होते. (Karnataka CM decision)