पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी ३१ मे रोजी दहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ४ जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये सुमारे ५००० अनिवासी भारतीयांसह रॅली काढणार आहेत. याशिवाय ते वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठालाही भेट देणार असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर 11 एप्रिल रोजी राहुल यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर हा पहिला विदेश दौरा आहे. ( Rahul Gandhi to visit USA )
अमेरिका दौर्यात राहुल गांधी राजकारणी आणि उद्योजकांचीही भेट घेणार आहेत. तसेच वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये त्यांचे भाषण होणार आहे. नुकतेच लंडन दौऱ्यावर गेलेले राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात केंद्र सरकार आणि भारतीय लोकशाहीवर टीका केल्याने चर्चेत आले होते. मार्च 2023 मध्ये लंडन दौर्यावर असताना राहुल गांधी म्हणाले होते की, "प्रत्येकाला माहित आहे की भारतीय लोकशाही दबावाखाली आहे. तिच्यावर हल्ला होत आहे." राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. ( Rahul Gandhi to visit USA )
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजपने राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली होती, तर काँग्रेसने अदानी समूहाच्या कंपन्यांकडून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करत संयुक्त सदस्य समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली होती.
पंतप्रधान मोदी २२ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींचे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जो बिडेन होस्ट करतील. व्हाईट हाऊसमध्ये पीएम मोदींसाठी डिनरचेही आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा :