PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७१ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरीत | पुढारी

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७१ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोजगार मेळावा मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.१५) देशभरातील ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्यांना पंतप्रधानांनी या नियुक्ती पत्रांचे वितरण केले.

पोस्ट कार्यालयातील पोस्ट सेवक, इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट या पदांबरोबरच विविध खात्यांतील तिकीट क्लार्क, कनिष्ठ क्लार्क कम टायपिस्ट, कनिष्ठ अकाउंटस क्लार्क, ट्रॅक मेंटेनर, असि. सेक्शन ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लार्क, उपविभागीय अधिकार, कर सहाय्यक आदी पदांसाठीच्या उमेदवारांना ही नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारत सरकारची प्रत्येक योजना, प्रत्येक धोरण युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. गेल्या 9 वर्षांत भारत सरकारने भांडवली खर्चावर सुमारे 34 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पूर्वी सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे अवघड होते, फॉर्म घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. आज अर्ज करण्यापासून ते निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. आता ग्रुप सी आणि डी पदांसाठी मुलाखतीची गरज नाही. यामुळे भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या शक्यता संपल्या आहेत. 2014 पूर्वी, देशातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे 4 लाख किलोमीटरपेक्षा कमी होते, परंतु आता ते 7.15 लाख किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे. 2014 पूर्वी देशात फक्त 74 विमानतळ होते. आज ही संख्या सुमारे 150 झाली आहे. काही दिवसांपूर्वी, मी वॉलमार्टच्या सीईओला भेटलो आणि त्यांनी सांगितले की, त्यांची कंपनी पुढील 3-4 वर्षांत 80,000 कोटी रुपयांची निर्यात करेल. लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी बातमी आहे. सिस्कोच्या सीईओने असेही सांगितले की, ते 8,000 कोटी रुपयांच्या मेड-इन-इंडिया उत्पादनांची निर्यात करण्याचे लक्ष्य देखील ठेवत आहेत. पुढील आठवड्यात मी मोठ्या कंपन्यांच्या सीईओंना भेटेन आणि ते सर्वजण भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

सरकारी खाती आणि मंत्रालयांमध्ये युवकांना रोजगार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडून मागील काही काळापासून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत दहा लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. रोजगार मेळाव्याचे औचित्य साधत पंतप्रधान मोदी युवकांना आभासी माध्यमातून मार्गदर्शन केले. देशातील एकूण ४५ ठिकाणी हा रोजगार मेळावा पार पडला.

हेही वाचा :

Back to top button