मल्लिकार्जुन खर्गेंसह कुटुंबीयांच्या हत्येचा कट? | पुढारी

मल्लिकार्जुन खर्गेंसह कुटुंबीयांच्या हत्येचा कट?

बंगळूर;  पुढारी वृत्तसेवा :  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, असा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे. याबाबत कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मल्लिकार्जुन खर्गे हे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. चित्तापूर येथून त्यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत असलेले भाजप उमेदवार मणिकंठ राठोड यांनी कार्यकर्त्याशी बोलताना खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपवण्याची भाषा केली आहे. याबाबतची ध्वनिफित सूरजेवाला यांनी ऐकवली. बंगळूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘रोड शो’ला काही मिनिटे असतानाच काँग्रेसने हा दावा केला. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली.

चौकशी करू : मुख्यमंत्री बोम्मई

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हत्येचा कट आखल्याचा दावा करण्यात आला आहे. सदर ऑडिओ तपासण्यात येईल. सत्य उघडकीस येणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

Back to top button