अतिक अहमदप्रमाणे माझ्‍याही डोक्‍यात गोळी मारतील : आझम खान यांनी व्‍यक्‍त केली भीती | पुढारी

अतिक अहमदप्रमाणे माझ्‍याही डोक्‍यात गोळी मारतील : आझम खान यांनी व्‍यक्‍त केली भीती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील गँगस्‍टर आणि माजी खासदार अतिक अहमद याच्‍या प्रमाणे माझीही डोक्‍यात गोळी झाडून गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात येईल, अशी भीती समाजवादी पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते आझम खान यांनी व्‍यक्‍त केली. रामपूर येथे महानगरपालिका निवडणुकीच्‍या प्रचार सभेत ते बोलत होते.

मागील काही दिवस आजारी असणारे आझम खान नुकतेच महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवार फातिमा जबी यांच्‍या प्रचारासाठी आयोजित सभेत म्‍हणाले की, ‘आम्ही मतदान करू, तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे; पण तोही आमच्याकडून दोनदा हिसकावला गेला. आता तिसर्‍यांदा हा हक्‍क हिरावून घेतला तर तुम्हाला श्वास घेण्याचाही अधिकार राहणार नाही, असेही त्‍यांनी उपस्‍थितांना सांगितले.

मला आणि माझ्‍या कुटुंबाला अशी गोळ्या घातल्या जाव्यात अशी इच्छा आहे का, माझ्याकडून आणि माझ्या मुलांकडून काय हवे आहे? असा सवालही त्‍यांनी यावेळी केला. रामपूर महापालिका कंत्राटावर आहे, असा आरोप करणार्‍यांनी संपूर्ण देश करारावर ठेवला होता, लाल किल्ला विकला गेला, विमानतळ विकले गेले, बंदरे विकली गेली, रेल्वे विकली गेली, आता काय उरले आहे, असे सवालही त्‍यांनी केला.

द्वेषपूर्ण भाषणासाठी न्यायालयाने आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. २०१९ मध्ये रामपूर येथे निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियुक्‍त केलेल्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केल्याबद्दल खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आझम खान हे रामपूर मतदारसंघाचे आमदार होते. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात न्यायालयाने खान यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर राज्य विधानसभा सचिवालयाने ऑक्टोबर २०२२ सुरुवातीला त्यांना विधानसभा सदस्‍य पदावरुन अपात्र घोषित केले होते.

हेही वाचा :

 

 

Back to top button