गोव्यात आयपीएल सट्टेबाजांवर छापा; छत्तीसगडमधील १४ जणांना अटक | पुढारी

गोव्यात आयपीएल सट्टेबाजांवर छापा; छत्तीसगडमधील १४ जणांना अटक

पणजी : पुढारी वृत्तसेवा आयपीएलमधील राजस्थान-चेन्नई क्रिकेट सामन्याची बेटिंग घेणार्‍या छत्तीसगडमधील 14 जणांना गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण (क्राईंम ब्रांच) विभागाच्या पथकाने पर्वरीतून काल (शुक्रवार) अटक केली. त्यांच्याकडून 25.38 लाखांचे साहित्य जप्त केले.

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांचे बेटिंग गोव्यामध्ये घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी एका सामन्यासाठी बेटिंग प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. गुरुवारी (दि.27) रात्री राजस्थान रॉयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग यांच्यात सामना होता. तो सामना रंगतदार स्थितीत आला असताना या सामन्यांची बेटिंग घेण्यासाठी खास गोव्यात आलेल्या व्यक्तींनी बेटिंग घेण्यास सुरुवात केली. गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण (क्राईम ब्रांच) विभागाला याची माहिती मिळताच पीडीए कॉलनी, पर्वरी येथील एका बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला व छत्तीसगडमधील 14 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 47 मोबाईल, 3 एलईडी टीव्ही, 11 लॅपटॉप असे एकूण 25.38 लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. तसेच 38 हजारांची रक्कम जप्त केली.

गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय…

गोव्यात अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी काही परराज्यातील लोक येतात. मागील दोन वर्षांतील घटनांचा आढावा घेतल्यास हे प्रमाण वाढलेले आहे. गोव्यात येऊन एखादी खोली किवा बंगला भाड्याने घेऊन तेथे आपले बस्तान बसवून काळे धंदे करण्याचे काम हे लोक करताना दिसतात. यापूर्वीही आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी पर्वरी, कळंगुट व दोनापावला येथे काहींना अटक झाली होती.

हेही वाचा : 

Back to top button