नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांना सध्यातरी दिलासा मिळताना दिसत नाही. सीबीआयकडून चौकशी सुरू असलेल्या अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी १२ मेपर्यंत वाढवली आहे.
याआधी, राऊस एव्हेन्यू कोर्टाने अबकारी घोटाळ्याशी संबंधित अंमलबजावणी संचालनालय प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील आदेश २८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलला होता. सीबीआय सिसोदिया यांच्या जामिनाला सातत्याने विरोध करत आहे.
त्याचवेळी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मंगळवारी (दि.२५) माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य तिघांविरुद्ध कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी आरोपपत्रावर विचार करण्यासाठी १२ मेची तारीख निश्चित केली आहे. सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी सिसोदिया यांना अटक केली होती. ५८ व्या दिवशी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.